'माझ्यातला फलंदाज सर्वांना समजला'; शार्दूलनं सांगितलं त्याचं खास सिक्रेट!

सुनंदन लेले
रविवार, 12 जानेवारी 2020

गेल्या काही दिवसांत शार्दूल ठाकूर चांगल्या गोलंदाजीबरोबर धडाकेबाज फटकेबाजीकरिता प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळेच त्याच्याशी केलेली ही खास बातचीत...

तुमच्यापैकी किती लोकांना याची कल्पना आहे की, शार्दूल ठाकूरचे नाव वर्तमानपत्रात कोणत्या कामगिरीबद्दल आले होते? ऐकून आश्‍चर्य वाटेल, पण शार्दूलचे नाव पहिल्यांदा वर्तमानपत्रात आले ते 2006 मध्ये शालेय क्रिकेट स्पर्धेत सलग 6 चेंडूंवर 6 षटकार मारले म्हणून.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

होय, शार्दूलला भारतीय संघात गोलंदाज म्हणून स्थान मिळालेले असले तरी त्याचा शालेय जीवनात बोलबाला बेधडक फटकेबाजीकरिता झाला होता. गेल्या काही दिवसांत शार्दूल ठाकूर चांगल्या गोलंदाजीबरोबर धडाकेबाज फटकेबाजीकरिता प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळेच त्याच्याशी केलेली ही खास बातचीत... 

Image may contain: 1 person, outdoor

पालघरचा रहिवासी शार्दूल ठाकूर भारतीय संघात दाखल होऊन तीनपेक्षा जास्त वर्षांचा काळ लोटून गेला तरी त्याचा जम बसताना दिसत नव्हता. 2016 मध्ये शार्दूलला भारतीय संघात स्थान मिळाले; पण त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण 2017 मध्ये झाले. शार्दूलने 10 क्रमांकाचा शर्ट घातला म्हणून जरा चर्चाही रंगली; कारण तो मान सचिन तेंडुलकरचा होता. नंतर शार्दूलने 54 क्रमांकाला आपलेसे केले. 

- Happy birthday Rahul Dravid : टीम इंडियाची 'दीवार'!

2018 मध्ये निदहास करंडक स्पर्धेतील टी-20 सामन्यात शार्दूलने चार फलंदाज बाद करून सामना भारताकडे झुकवला. त्याच्या गोलंदाजीतील कौशल्य बघून चाणाक्ष महेंद्रसिंह धोनीने शार्दूलला चेन्नई सुपर किंग्ज संघात दाखल करून घेतले. 

Image may contain: 2 people, sunglasses and close-up

तो मोठा आघात 

मग शार्दूलच्या कारकिर्दीत अचानक एक स्पीड ब्रेकर आला. ''कारकीर्द चांगला आकार घेत असताना मला 22 मे 2019 ला दुखापत झाली. माझ्याकरिता तो मोठा आघात होता. ऑपरेशनशिवाय पर्याय नव्हता. ऑपरेशन करून घेतल्यावर डॉक्‍टरांनी मला पूर्ण बरे व्हायला अडीच ते तीन महिने लागतील असे सांगितले.

Image may contain: 2 people, people sitting, shorts and outdoor

नकारात्मकता झटकायला मी थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमी गाठण्याचा निर्णय घेतला. सांगून खोटे वाटेल, पण अडीच महिन्यात मी फक्त दोन वेळा घरी गेलो बाकी सर्व वेळ फक्त रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशनमधे गुंतवला. घरच्यांनी मला मोलाची साथ दिली आणि अडीच महिन्यात मी नुसता बरा झालो नाही तर गोलंदाजीही करू लागलो,'' शार्दूल ठाकूरने सांगितले. 

- रहाणेच्या ट्विटवर तेंडुलकरचं उत्तर, प्रश्न वाचाल तर तुम्हीही म्हणाल..

लयीत बदल होण्याची भीती 

इतर वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत शार्दूल उंचापुरा नाहीये, पण त्याच्या पायात जबरदस्त ताकद आहे. तसेच गोलंदाजी करतानाची त्याची लय आणि चेंडू हातातून सोडताना तो झटका देतो, त्यामुळे तो फलंदाजाला चकित करून सोडतो.

Image may contain: 2 people, including Kisan Tukaram Dadage, people smiling

''ऑपरेशननंतर माझ्या लयीत काही बदल होत नाही ना, काही अडचण येत नाही ना याचीच मला धास्ती वाटत होती. क्रिकेट देवाची कृपा होती म्हणून सगळे सुरळीत झाले,'' शार्दूल म्हणाला. 

'तुला मानला रे ठाकूर' 

नुकत्याच वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत 1-1 बरोबरी झाली असताना निर्णायक सामन्यात शार्दूलने 6 चेंडूंत 2 चौकार आणि एक षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. शार्दूलची ती खेळी कर्णधार विराट कोहलीला फार पसंत पडली.

Image may contain: 2 people, including Tukaram Kale, people smiling, people sitting and indoor

विराटने 'तुला मानला रे ठाकूर' असे ट्‌विट केले आणि सोशल मीडियावर एकच धमाल उडाली. ''माझ्याकरिता ती बेस्ट शाबासकी होती. मर्यादित षटकांच्या सामन्यात बॅट हाती आल्यावर मी मोलाची खेळी करू शकतो याचा मला आनंद झाला. त्या खेळीमुळे माझ्यातला फलंदाज जो आजवर फक्त मला माहित होता तो आता सर्वांना समजला,'' उत्साहाने बोलताना शार्दूल म्हणाला. 

- 'या' दिग्गज क्रिकेटपटूची पत्नी पडद्यावर साकारणार झूलन गोस्वामी

लांबचा प्रवास, पावलं दमदार 

नुकतेच पुण्यातील टी-20 सामन्यात शार्दूल ठाकूरने आपली उपयुक्तता दाखवून देताना आठ चेंडूंत 22 धावांची नाबाद खेळी केली, वर दोन श्रीलंकन फलंदाजांना बादही केले. क्रिकेट समालोचक शार्दूलला आता अष्टपैलू खेळाडू म्हणून बघू लागले आहेत.

Image may contain: 3 people, people smiling, hat, stripes and close-up

या बाबत विचारले असता शार्दूल म्हणाला, ''मला हाती आलेल्या यशाने हुरळून जायचे नाही. मी दुखापतीतून खूप काही शिकलो आहे. क्रिकेटचे मोल आणि प्रेम मला नव्याने उमगले आहे. भारतीय संघात जागा पक्की करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करून दाखवण्याची मेहनत आता चालू राहणार आहे. प्रवास लांबचा आहे, जो मला दमदार पावले टाकत करायचा आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunandan Lele took an interview of Indian cricketer Shardul Thakur