डिव्हीलर्सच्या डोळ्यात अश्रु, कोहलीच्या डोळ्यांत चमक...

सुनंदन लेले
सोमवार, 12 जून 2017

''काही लोक मी तरीही कप्तानपदी का राहू इच्छितो विचारत आहे. मला भरवसा आहे की मी चांगला नेता आहे...या संघात दम आहे आणि 2019 सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत हाच संघ माझ्या नेतृत्त्वा खाली सर्वोत्तम कामगिरी करेल असा मला विश्‍वास आहे,'' डोळ्यातील पाणी लपवत डिव्हीलर्स म्हणाला

खेळाच्या मैदानावरचे दृश्‍य कधीकधी मन हेलावून टाकते. कारण विजय हाती लागलेल्या खेळाडूच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद नांदत असतो; तर पराभवाच्या खाईत लोटल्या गेलेल्या खेळाडूच्या चेहऱ्यावर विषण्ण भाव काळ्या कुट्ट ढगांसारखे पसरलेले असतात. नेमके तसेच काहीसे रविवारी संध्याकाळी ओव्हल मैदानावर बघायला मिळाले.

दक्षिण आफ्रिकेला दणक्‍यात पराभूत करून उपांत्य फेरीत दाखल झाल्यावर विराट कोहलीच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि डोळ्यात चमक होती. दुसऱ्या बाजूला ए बी डिव्हीलर्सच्या चेहऱ्यावर विषण्ण भाव आणि डोळ्यात पाणी होते.

रविवारचा दिवस जणू काही विराट कोहलीचा होता. नाणेफेकीपासून ते संघातील एकमेव बदलापर्यंत, क्षेत्ररक्षणामधल्या सुधारणेपासून ते गोलंदाजांच्या कमाल कामगिरीपर्यंत सगळेच काही विराटच्या मनासारखे होत गेले. ""सामना चालू होत असताना मी खेळाडूंना जान ओतून प्रत्येक चेंडूवर नजर ठेवायचे आवाहन केले होते. आपल्या गोलंदाजांनी अचूक मारा करून काम केले ज्याला चपळ क्षेत्ररक्षणाने साथ दिली. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना हात मोकळे करून फटके मरायची संधी मिळाली नाही तिथेच दडपण वाढत गेले. आजच्या यशाचे श्रेय गोलंदाजांना द्यायला पाहिजे,'' असे विराट म्हणाला.

""खेळपट्टीचा स्वभाव लक्षात घेऊन भारतीय गोलंदाजांनी उजव्या स्टंपवरचा मारा केला. त्यांच्या क्षेत्ररक्षणात चमक होती ज्याने त्यांनी एकेरी धावांना बांध घातला. त्यानेच आमच्या फलंदाजीवरचे दडपण वाढले. तीन फलंदाज धावबाद होणे चांगले लक्षण नाही. भारतीय संघाने आखलेल्या योजनांचा योग्य पाठपुरावा केला असेच म्हणावे लागेल,'' डिव्हीलर्स सांगत होता. ""गेल्या दीड वर्षात आम्ही मोठ्या संघांना टक्कर देत चांगले एक दिवसीय सामने जिंकले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीची आमची तयारी चोख होती. नेमकामोक्‍याच्या क्षणी आम्हांला कामगिरीत "फिनिशींग टच' देता आला नाही'', निराश चेहऱ्याने डिव्हीलर्स म्हणत होता.

कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असताना डिव्हीलर्सला बोचरे सवाल विचारले जात होते. "आयसीसी स्पर्धांमधील आमची कामगिरी का खराब होते याचे उत्तर आम्हांला सापडत नाही, ही खरी गोष्ट आहे. काही लोक मी तरीही कप्तानपदी का राहू इच्छितो विचारत आहे. मला भरवसा आहे की मी चांगला नेता आहे...या संघात दम आहे आणि 2019 सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत हाच संघ माझ्या नेतृत्त्वा खाली सर्वोत्तम कामगिरी करेल असा मला विश्‍वास आहे'', डोळ्यातील पाणी लपवत डिव्हीलर्स म्हणाला.

सोमवारचा दिवस संपूर्ण विश्रांती घेऊन मंगळवारपासून भारतीय संघ उपांत्य सामन्याच्या तयारीला लागणार आहे.

Web Title: sunandan lele writes about cricket