वृद्धिमान सहाच्या अप्रतिम यष्टिरक्षणाचे झाले कौतुक...

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

विकेट किपींग हा थॅंकलेस जॉब आहे हे माहीत असून जर क्रिकेट जाणकारांना माझ्या खेळाचे कौतुक वाटत असले, तर मी धन्य झालो

कोलंबो कसोटीसह मालिका 2-0 फरकाने जिंकून भारतीय संघाने मुसंडी मारणारा खेळ पुढे चालू ठेवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयाची मोहोर उमटवलेली आहे. इतकेच नाही तर श्रीलंकेत दोन मालिका जिंकणारा कोहली पहिला भारतीय कप्तान ठरला आहे. सामना चार दिवसात संपल्याने भारतीय संघातील खेळाडूंनी सोमवारचा दिवस आराम करण्यात घालवला. सोमवारी वृद्धीमान सहा पत्रकारांना भेटला. कोलंबो कसोटीतील सहाच्या खेळाने भलेभले क्रिकेट जाणकार चकित झाले. दस्तुरखुद्द सुनील गावसकरांनी सहाच्या खेळाची तोंड भरून स्तुती केली. कोलंबो कसोटीचे सामनावीराचे बक्षीस सहाला केवळ त्याच्या अफलातून यष्टिरक्षणाबद्दल मिळायला हवे होते, या शब्दांत हर्षा भोगलेंनी सहाचे कौतुक केले.

""विकेट किपींग हा थॅंकलेस जॉब आहे हे माहीत असून जर क्रिकेट जाणकारांना माझ्या खेळाचे कौतुक वाटत असले, तर मी धन्य झालो,'' असे अत्यंत नम्र स्वभावाच्या सहाने सांगितले. सिलीगुडी सारख्या क्रिकेट सुविधा नसलेल्या शहरातून सहा पुढे आला. ""मला माझे प्रशिक्षक जयंत भौमिक यांनी विकेट किपींग शिकवत असताना चेंडूच्या टप्प्यावर नजर ठेवून त्याच्या उसळीबरोबर उठायचे तंत्र घोटवून घेतले होते. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तेच तंत्र कामाला येत आहे,'' असे सहाने सांगितले. कोलंबो कसोटीबद्दल बोलताना सहा म्हणाला, ""अश्‍विन आणि जडेजाने फारच सुंदर मारा केला. दुसऱ्या डावात मेंडीस आणि करुणारत्नेने स्वीपच्या फटक्‍याचा वापर करून आम्हांला यशाकरता झगडायला लावले. आम्हांला खात्री होती की जम बसलेले दोन फलंदाज बाद झाले की विजय हाती येणारच''

सहाच्या यष्टिरक्षणाच्या तंत्राचे सुनील गावसकर आणि हर्षा भोगलेंबरोबर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही कौतुक केले. प्रसाद हे स्वत: यष्टिरक्षक होते. सहाने दुसऱ्या डावात मॅथ्यूजचा पकडलेला झेल फार प्रेक्षणीय होता, असा विशेष उल्लेख सगळ्यांकडून करण्यात आला. ""मला ऍडम गिलख्रिस्ट फार आवडायचा. विकेट किपींग बरोबर त्याची आक्रमक फलंदाजी मला भावायची. लहानपणी मी सुद्धा 10 पैकी 7 चेंडू मारायचो. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला लागल्यावर प्रत्येक चेंडू मारून चालत नाही हे समजू लागले आहे,'' असे सहा हसत म्हणाला.

दोन दिवसांची विश्रांती घेऊन भारतीय संघ 9 तारखेपासून शेवटच्या कसोटीच्या तयारीला लागणार आहे.

Web Title: sunandan lele writes about Wriddhiman Saha