
Ravindra Jadeja : हे अजिबात चालणार नाही, इतके मॅन ऑफ द मॅच मिळालेत... गावसकरांनी जडेजाचे पिळले कान
Sunil Gavaskar Ravindra Jadeja : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस आज झाला. पहिल्याच दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला कांगारूंनी 109 धावात गुंडाळले. त्यानंतर कांगारूंनी आपल्या पहिल्या डावाची सुरूवात चांगली केली होती. मात्र रविंद्र जडेजाने कांगारूंचे पहिले 4 फलंदाज बाद करत त्यांची अवस्था दिवसअखेर 4 बाद 156 अशी केली. मात्र तरी देखील भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे रविंद्र जडेजावर खूष नाहीत.
रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा झुंजार सलामीवीर उस्मान ख्वाजाला 60 धावांवर, मार्नस लाबुशानेला 31 तर स्टीव्ह स्मिथला 26 धावांवर बाद केले. याचबरोबर सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची शिकार देखील जडेजानेच केली. मात्र तरी देखील सुनिल गावसकरांनी जडेजाने पहिल्या दिवशी केलेल्या एका चुकीवरून त्याचे कान पिळले.
रविंद्र जडेजाने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला स्वस्तात बाद करत कांगारूंना अडचणीत आणले होते. हेड बाद झाल्यानंतर मार्नस लाबुशाने क्रिजवर आला होता. कसे बसे एक षटक खेळलेल्या मार्नसला जडेजाने टाकलेला चेंडू कळाला नाही अन् तो क्लीन बोल्ड झाला. भारताने दुसऱ्या विकेटचा आनंद साजरा करण्यास सुरूवात केली. मात्र तोपर्यंत नो बॉलचा बीप वाजला अन् या आनंदावर विरजन पडलं.
सुनिल गावसकर आणि रवी शास्त्रींना जडेजाचे हे नो बॉल टाकणे रुचले नाही. समालोचन करत असताना गावसकर म्हणाले, 'हे अजिबात चालणार नाही. जडेजाला काही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले आहे. मात्र फिरकीपटूने अशा प्रकारचा नो बॉल टाकणे योग्य नाही. हा नो बॉल भारताला महागात पडू शकतो.'
ते पुढे म्हणाले की, 'बॉलिंग कोच पारस म्हांब्रेंनी त्याच्यासोबत काम करत त्याला लाईनच्या मागून गोलंदाजी करायला सांगितलं पाहिजे. जडेजाने नो बॉल टाकला नसता तर लाबुशाने भोपळाही न फोडता माघारी गेला असाता. अशा छोट्या गोष्टी या खेळपट्टीवर खूप महागात पडू शकतात.'
जडेजाचा हा नो बॉल भारताला चांगलाच महागात पडला. मार्नसने उस्मान ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. मार्नसने 31 धावांचे योगदान दिले. या जोडीने ऑस्ट्रेलियाला शतकी मजल मारून दिली. या जोरावरच कांगारूंनी पहिल्या दिवशी 4 बाद 156 धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावातील आघाडी 47 धावांपर्यंत पोहचवली.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...