Sunil Gavaskar : समोर रक्त असताना गायकवाड यांचे कसोटी पदार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Gavaskar

Sunil Gavaskar : समोर रक्त असताना गायकवाड यांचे कसोटी पदार्पण

मुंबई - अंशुमन गायकवाड यांचे कसोटी पदार्पणच रक्त पाहून झाले होते. त्यामुळे त्यांना त्याची भीती नव्हती, म्हणूनच भेदक मारा झेलण्याची जिगर त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून निर्माण झाली, अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी गायकवाड यांच्या आठवणी जागवल्या.

अंशुमन गायकवाड यांच्या ‘गट्‌स अमिडस्ट ब्लडबाथ’ या पुस्तकाचे आज मुंबईत प्रकाशन झाले. त्यावेळी गावसकर, कपिलदेव यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत दिग्गज खेळाडू उपस्थित होते. यावेळी बोलताना गावसकर म्हणाले, वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशात झालेल्या कसोटीत टायगर पतौडी यांना रॉबर्टसचा चेंडू लागला.

मैदानावर रक्त सांडले होते, त्यांना जखमी निवृत्त व्हावे लागले. त्यामुळे त्या वेळी मधल्या फळीत खेळणाऱ्या अंशुमन यांना मैदानात यावे लागले. समोर रक्त पडलेले असताना कसोटी पदार्पण करणे सोपे नव्हते, पण अंशुमन यांनी जिगर दाखवली. एवढेच नव्हे तर गुंडाप्पा विश्वनाथ यांच्यासह महत्त्वाची भागीदारी केली. त्यामुळे तो कसोटी सामना भारताने अनिर्णित सोडवला आणि तेथूनच भारतीय संघाच्या प्रतिकारास सुरुवात झाली.

अंशुमन यांच्यामध्ये मोठीच गुणवत्ता होती. ऑफस्पिनर म्हणून त्यांनी कारकिर्द सुरू केली असली तरी पुढे जाऊन ते माझे सलामीचे साथीदार झाले. आमच्या भागीदारींमध्ये मी त्यांना कधीही धावचीत केले नाही म्हणून आमचे संबंध मित्रत्वाचे राहिले, असे गावसकर यांनी हसत हसत सांगितले.

माझे वडील दत्ताजी गायकवाड हे स्वतः कसोटीपटू होते, १९६९ मध्ये ब्रेबॉर्नवर झालेला कसोटी सामना मी प्रेक्षकांमध्ये बसून पाहिला होता, पण पुढच्या चार वर्षांत मी कसोटीपटू झालो, असे अंशुमन यांनी सांगून आपल्या कारकिर्दीचा आढावा घेतला.सहा कर्णधार एकाच व्यासपीठावर भारताचे माजी सलामीवीर आणि जिगरबाद फलंदाज अंशुमन गायकवाड यांच्या ‘गट्‌स अमिडस्ट ब्लडबाथ’ या पुस्तकाचे शुक्रवारी मुंबईत ‘सीसीआय’ येथे प्रकाशन झाले,

त्यावेळी भारतीय संघाचे सहा माजी कर्णधार- कपिलदेव, सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर उपस्थित होते या वेळी छायाचित्रात अंशुमन गायकवाड यांच्यासह ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष आणि माजी खेळाडू रॉजर बिन्नी, करसन घावरी आणि झहीर खान.