सुशील, योगेश्‍वरच्या सहभागाबाबत प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - सुशील कुमार, तसेच योगेश्‍वर दत्त यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी असलेल्या शिबिरापासून दूर राहण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या संघ निवड चाचणीतील सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरवातीस सोनीपत (हरियाणा) येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात मुख्य मार्गदर्शक जगमिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वतयारी शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराकडे सुशील आणि योगेश्‍वर दोघांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळे शिबिरासाठी निवडलेल्या 37 कुस्तीगीरांत त्यांचा समावेश नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आशियाई कुस्ती स्पर्धा नवी दिल्लीत 10 ते 14 मे दरम्यान होईल.

भारतीय कुस्ती संघाच्या निवडीसाठी निवड चाचणीतील कामगिरी हा निकष असतो. या चाचणीत सुशील, तसेच योगेश्‍वर सहभागी होऊ शकतील आणि त्याद्वारे ते भारतीय संघात स्थान मिळवतील, असे सांगितले जात होते; मात्र, अद्याप याबाबत भारतीय कुस्ती पदाधिकाऱ्यांतच मतभेद आहेत. चाचणी शिबिरातील कुस्तीगीरांनाच निवड चाचणीत प्रवेश असावा, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यातच दोन कुस्तीगीर उपलब्धता कळवूनही शिबिरास हजर राहिलेले नाहीत. शिबिरात सहभागी न होता सुशील, योगेश्‍वरला चाचणीत प्रवेश दिल्यास शिबिरापासून दूर राहिलेले अन्य कुस्तीगीरही आपल्याला निवड चाचणीत सहभागी करून घेण्याचा आग्रह धरतील, असे काहींचे मत आहे. निवड चाचणीच्या सहभागासंदर्भातला पेच एका आठवड्यात सुटेल अशी आशा पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

Web Title: sushil, yogeshwar involve issue