स्वित्झर्लंडने नाकारला भारतीय सायकलपटूंना व्हिसा

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

कुमार गटाच्या ट्रॅक सायकलिंगच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाला स्वित्झर्लंड दूतावासाने व्हिसा नाकारल्याचे समोर आले आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमध्ये अईग्ले येथे 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. 
 

नवी दिल्ली- कुमार गटाच्या ट्रॅक सायकलिंगच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाला स्वित्झर्लंड दूतावासाने व्हिसा नाकारल्याचे समोर आले आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमध्ये अईग्ले येथे 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. 

भारतीय संघात बिलाल अहमद दर, गुरप्रीत सिंग, मनोज साहू, नमन कपिल, वेंकप्पा शिवप्पा आणि प्रशिक्षक अमर सिंग याचा समावेश करण्यात आला आहे. या संघाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंड दूतावासाकडे व्हिसा मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांनी स्वित्झर्लंडला जाण्याचे नेमके कारण, किती दिवस राहणार याविषयी योग्य तपशील नसल्याचे सांगत व्हिसा नाकारत असल्याचे कळविले आहे. 

भारतीय सायकलिंग महासंघाचे सरचिटणीस ओंकार सिंग यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता आणि सविस्तर माहिती दिल्यानंतरही व्हिसा नाकारण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी आक्षेप घेतल्यानंतरही आम्ही स्वित्झर्लंड स्पर्धा संयोजकाकडून आलेले निमंत्रणही जोडल्याची माहिती ओंकार सिंग यांनी दिली. 

स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी केवळ आजचा दिवस होता. मात्र, व्हिसा मिळत नसल्यामुळे पुढील कार्यवाही करता आली नसल्याचे सायकलिंग महासंघाचे म्हणणे आहे. प्रवेशिका भरण्यात आलेली अडचण संयोजन समितीला कळविण्यात आली असून, आम्ही त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Switzerland Embassy denies visa to Indian cycling team