
नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट कधीच संपणार नाही; परंतु ट्वेन्टी-२० लीगचे वाढते प्रस्थ पाहता भविष्यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू खेळतील का, हा गांभीर्याने विचार करण्याचा प्रश्न आहे, अशी खंत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज इयन चॅपेल यांनी बोलून दाखवली आहे. टी-२० लीगचे प्रस्थ जगभरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या देशाच्या संघात कसोटी क्रिकेटसाठी कायम राखण्याचे आव्हान असणार आहे, असे सांगून ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार चॅपेल म्हणाले, कसोटी क्रिकेटचे अस्तित्व कायमच रहाणार आहे, प्रश्न क्रिकेटच्या या सर्वाधित श्रेष्ठ प्रकारात कोण कोण खेळणार हे महत्त्वाचे आहे.
दिग्गज खेळाडू जर कसोटी क्रिकेट खेळणार नसतील तर हे सामने पाहायला तरी कोण येणार आहे, हा प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. कसोटी हा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. मात्र या प्रकारात सर्व श्रेष्ठ खेळाडूंनी खेळत राहिले पाहिजे, असे चॅपेल म्हणाले.सध्याची एकूणच परिस्थिती पाहता कसोटी क्रिकेट केवळ आठ संघांपुरतेच मर्यादित राहाण्याची भीती व्यक्त करताना चॅपेल म्हणाले, वेस्ट इंडीज खेळाडूंचा कल ट्वेन्टी-२० क्रिकेटकडे अधिक आहे. श्रीलंकेकडे बऱ्यापैकी सुविधा आहेत, परंतु राजकीय परिस्थितीमुळे ते अडचणीत आहेत. अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना कसोटी दर्जा देऊन काहीही फरक पडलेला नाही.
आयपीएल संघ मालकांबाबत चिंता
७५ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेले चॅपेल यांनी आयपीएल संघ मालकांबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणतात, आयपीएलचे हे संघ मालक आता इतर देशांतील लीगमध्ये संघांची मालकी घेत आहेत. जर आयपीएलमध्ये चांगली किंमत मिळाली तर ऑस्ट्रेलियातील खेळाडूही लीगला अधिक प्राधान्य देतील.