तेंजिंदरचे सुवर्णपदक म्हणजे सोन्याहून पिवळे

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

हिमा दास विषयी काय बोलावे. तिच्याही कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. बिनधास्त धावणे हा तिचा स्थायीभाव असल्याने तिच्यावर कुठलाही दबाब जाणवत नाही. सुवर्णपदकासाठी तिच्यापुढे सल्वा नासेरचे कडवे आव्हान आहे, ही जाणीव असल्याने तिचा राष्ट्रीय विक्रम आणि तिने जिंकलेले कुठलेही पदक हे कौतुकास पात्र आहे.
 

ऍथलेटिक्‍समध्ये तेजिंदरपालसिंगच्या सुवर्णपदकामुळे भारताची सुरवात तर झकास झाली. सुवर्णपदक आणि तेसुद्धा स्पर्धा विक्रमासह म्हणजे एक प्रकारे बोनसच म्हणायला पाहिजे. सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू यापूर्वीही होऊन गेले. मात्र, स्पर्धाविक्रम भारतीयांसाठी दुर्मिळ झाला होता. त्यामुळे या सुवर्णपदकाचा सकारात्मक परिणाम इतर खेळाडूंवर होईल. त्यांचा स्वतःवरील विश्‍वास आणखी दृढ होईल. आपणही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, ही जाणीव इतर खेळाडूंना होईल, त्यामुळे तजिंदरच्या सुवर्णपदकाला विशेष महत्त्व आहे. तेजिंदरच्या मेहनतीला तोड नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे तो सुवर्णपदकांपेक्षा कामगिरी सुधारण्यास अधिक महत्त्व देतो, त्यामुळे त्याच्यासाठी पदक अधिक सोपे होते. वडील कर्करोगाने अंथरुणाला खिळले असतानाही तेजिंदरने देशासाठी सुवर्णपदक जिंकले, ही बाब इतरांना नेहमीच प्रेरणा देत राहील. 

हिमा दास विषयी काय बोलावे. तिच्याही कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. बिनधास्त धावणे हा तिचा स्थायीभाव असल्याने तिच्यावर कुठलाही दबाब जाणवत नाही. सुवर्णपदकासाठी तिच्यापुढे सल्वा नासेरचे कडवे आव्हान आहे, ही जाणीव असल्याने तिचा राष्ट्रीय विक्रम आणि तिने जिंकलेले कुठलेही पदक हे कौतुकास पात्र आहे.

चारशे मीटरमधील दुसरी भारतीय निर्मला शेरॉनला पदक जिंकायचे असेल, तर आणखी जोर लावावा लागेल. तिच बाब महम्मद अनस आणि आरोक्‍य राजीवविषयी म्हणायला हवे. पोलंड आणि झेक येथील विशेष प्रशिक्षणाचा आणि विविध स्पर्धेत सहभागी झाल्याचा फायदा दोघांना येथे मिळू शकतो. दोघांपैकी अनसला अधिक संधी आहे, असे वाटते. द्युतीचंदने प्राथमिक फेरीत भन्नाट कामगिरी केली. प्राथमिक फेरीत आपण आघाडीवर आहोत, हे माहीत झाल्यावर अनेक धावपटू अंतिम फेरीसाठी शक्ती राखून ठेवतात. द्युतीनेही तसेच केले असावे, असे वाटते. अंतिम फेरीत ती स्वतःला पूर्णपणे झोकून देईल, यात वाद नाही. आता सुरुवात झाली आहे, पुढील पाच दिवस भारतीय ऍथलिट्‌सचा डंका आणखी वाजेल, अशी आशा करू या. 
 

Web Title: Tanjinder's gold medal is very nice