Team India Holi : रंग बरसे भीगे चुनरवाली... टीम इंडियाची बसमध्येच रंगली होळी, विराट तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

team India holi Celebration

Team India Holi : रंग बरसे भीगे चुनरवाली... टीम इंडियाची बसमध्येच रंगली होळी, विराट तर...

Team India Holi Celebration : भारतात सर्वत्र होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. भारतीय संघ सध्या ऑस्टेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत व्यग्र असल्याने टीम इंडियातील खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत होळी खेळायला मिळणार नाही. मात्र टीम इंडियाने आपल्या सराव सत्र आणि सामन्यासाठी प्रवास यातून अखेर वेळ काढत टीमच्या बसमध्येच होळी खेळण्यास सुरूवात केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा दिसत आहेत. विराट कोहली तर फुल मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. तर या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध होळी गीत रंग बरसे भीगे चुनरवाली... हे गाणं लावण्यात आलं आहे. रोहितने टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा पेटंट रंग निळा रंग बसमध्येच उधळत होळीचा आनंद लुटला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमधील चार कसोटी सामन्यापैकी तीन सामने झाले आहेत. भारताने पहिले दोन सामने जिंकले आहेत तर तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेतील आपले आव्हान जीवंत ठेवले आहे.

मालिकेतील चौथा कसोटी सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या संपूर्ण मालिकेत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. आता अहदाबादमध्ये कोणती खेळपट्टी वापरली जाते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र व्हायचं असेल तर भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे खेळपट्टी ही फिरकीला साथ देणारीच असेल असा होरा आहे. मात्र गुजरात क्रिकेट असोसिएशनने अजून कोणती खेळपट्टी वापरणार हे ठरवलेले नाही.

भारतीय संघातील रोहित शर्मा आणि अक्षर पटेल सोडला तर इतर फलंदाजांना या मालिकेत 30 ची सरासरी देखील राखता आलेली नाही. विराट कोहलीच्या बॅटमधून कधी कसोटी शतक येते याची चाहते 2019 पासून वाट पाहत आहेत. विराट चौथ्या कसोटीत तरी शतक ठोकून हा कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवतो का याकडे देखील चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर