स्पर्धेतील संघ वाढले, समान बक्षीस दूरच

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धा 24 वरून 32 संघांची करण्यात आली. पॅरिसला झालेल्या विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेस जागतिक स्तरावर लाभलेल्या प्रतिसादामुळे हा निर्णय झाला, पण याच स्पर्धेत झालेली समान बक्षिसाच्या मागणीनंतर नवा निर्णय झाला नाही.

झुरिच : विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धा 24 वरून 32 संघांची करण्यात आली. पॅरिसला झालेल्या विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेस जागतिक स्तरावर लाभलेल्या प्रतिसादामुळे हा निर्णय झाला, पण याच स्पर्धेत झालेली समान बक्षिसाच्या मागणीनंतर नवा निर्णय झाला नाही.

जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाचे अध्यक्ष गिआनी इनफॅंटिनो यांनी विश्‍वकरंडक स्पर्धेतील संघांची संख्या वाढवण्याचे जाहीर केले होते. त्याचीच अंमलबजावणी झाली. महिला फुटबॉलच्या प्रगतीसाठी हे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले. यापूर्वीच त्यांनी 2026 ची विश्‍वकरंडक स्पर्धा 32 ऐवजी 48 संघांची असेल असे जाहीर केले आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धा यशस्वी झाली असली तरी एकतर्फी निकालाचा प्रगतीत अडथळा येईल असे मानले जात होते. त्यासाठी अमेरिकेच्या थायलंडविरुद्धच्या 13-0 विजयाकडे लक्ष वेधले जात होते. मात्र, स्पर्धेतील संघ वाढवण्याचा निर्णय एकमताने झाला. 2023 च्या स्पर्धेचे ठिकाण ठरलेले नाही, पण यापूर्वीच ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अर्जेंटिना, बोलिव्हिया, कोलंबिया, जपान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया (उत्तर कोरियासह) यांनी तयारी दाखवली आहे.

स्पर्धेतील संघ वाढवण्याची ही तिसरी वेळ. 1991 पासून सुरू झालेली स्पर्धा 12 संघांची होती. चार वर्षांपूर्वी ती 16 ऐवजी 24 संघांची झाली. या स्पर्धेतील बक्षीस रक्कम दुप्पट करण्याचे जाहीर झाले आहे. यंदा रक्कम पाच कोटी डॉलर होती. वाढत्या बक्षिसाबरोबरच महिला फुटबॉलमध्ये चार वर्षात एकंदर एक अब्जची गुंतवणूक होईल, असेही जाहीर करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teams increaed in fifa womens world cup