राज्य बुद्धिबळ संघटनेवर अखेर अस्थायी समिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेचा कारभार पाहण्यासाठी अखेर अस्थायी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पाच सदस्यांची असून त्याच्या अध्यक्षपदी नागपूरचे दिलीप कामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेचा कारभार पाहण्यासाठी अखेर अस्थायी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पाच सदस्यांची असून त्याच्या अध्यक्षपदी नागपूरचे दिलीप कामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने २५ डिसेंबरला अंतर्गत संघर्षामुळे राज्य संघटना बरखास्त केली होती. त्या वेळी अस्थायी समिती काही दिवसांतच जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष परदेशात गेल्यामुळे ही नियुक्ती जाहीर होणे लांबले होते; मात्र अखेर याबाबतचे पत्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवल्याचे समजते. संघटना अध्यक्ष तसेच सचिव यांच्यातील संघर्ष संपवण्याचे प्रयत्न विफल ठरल्याचे अखिल भारतीय महासंघाने पत्रात म्हटले आहे. 

पाचसदस्यीय समितीची नियुक्ती नेमताना अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने यापूर्वी शक्‍यतो कोणत्याही समितीत नसलेल्या व्यक्तींची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. आता या समितीचा कालावधी अद्याप निश्‍चित नाही. 

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची वार्षिक सभा मार्चमध्ये होईल. त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. त्यापूर्वी वाद संपल्यासही संघटना पुन्हा कार्यरत होऊ शकेल, असे भारतीय बुद्धिबळ पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अस्थायी समितीस राज्याची संघनिवड, तसेच समितीच्या सुरळीत कामकाजासाठी नियमावली करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. तसेच समितीच्या नावाने स्वतंत्र बॅंक अकाउंटही उघडण्यात येईल. 

अस्थायी समिती
दिलीप कामदार (अध्यक्ष, नागपूर)
अनिल ताडे (सचिव, दक्षिण महाराष्ट्र)
चंद्रशेखर गोखले (मध्य महाराष्ट्र)
चारुदत्त देवसाळे (मराठवाडा)
विश्‍वनाथ माधव (मुंबई उपनगर)

Web Title: temporary committee on State Chess Association