Tennis Grand Slam : स्टेफानोसची फ्रेंच स्पर्धेत विजयी वाटचाल कायम ennis Grand Slam French tournament Stefanos continues | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tennis Grand Slam

Tennis Grand Slam : स्टेफानोसची फ्रेंच स्पर्धेत विजयी वाटचाल कायम

पॅरिस : ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपास याने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील विजयी वाटचाल बुधवारीही कायम ठेवली. त्याने दुसऱ्या फेरीच्या लढतीत स्पेनच्या रॉबर्टो बाएना याच्यावर ६-३, ७-६, ६-२ असा विजय मिळवला आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला.

स्टेफानोस त्सित्सिपास याने पहिला सेट ६-३ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली; पण पुढील सेटमध्ये रॉबर्टो याच्याकडून त्सिसीपास याला कडवी झुंज मिळाली. पण ग्रीसच्या खेळाडूने दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि दुसरा सेट ७-६ असा आपल्या नावावर केला. अखेरच्या सेटमध्ये त्सित्सिपासच्या झंझावातासमोर रॉबर्टोची डाळ शिजली नाही. त्सित्सिपासने ६-२ असा हा सेट जिंकत सामनाही आपल्या नावावर केला. ग्रीसच्या टेनिसपटूने २ तास व १६ मिनिटांमध्ये ही लढत जिंकली.

विजयी पुनरागमन

महिला विभागात युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने ग्रँडस्लॅममध्ये झोकात पुनरागमन केले. २०२२मधील ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमनंतर पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्वितोलिना हिने स्टॉर्म सँडर्स हिला २-६, ६-३, ६-१ असे पराभूत केले. पहिला सेट ६-२ असा गमावल्यानंतर स्वितोलिना हिने पुढील दोन ६-३, ६-१ असे जिंकले आणि लढतीत यश मिळवले. याआधी युक्रेन व रशिया यांच्यामधील युद्ध यामुळे एलिना मानसिक तणावामधून जात होती. तसेच बाळंतपण यामुळेही तिला टेनिसमधून ब्रेक घ्यावा लागला होता.

ओस्तापेंकोचा पराभव

सतरावी मानांकित येलेना ओस्तापेंको हिला महिला एकेरी विभागाच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या २१ वर्षीय पेटन स्टर्न्स हिने ओस्तापेंकोवर ६-३, १-६, ६-२ असा विजय मिळवला. स्टर्न्स हिने एक तास व ४३ मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची किमया साधली ओस्तापेंको हिने २०१७मध्ये फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकले होते. दरम्यान, कमिला जिऑर्जी हिने माघार घेतल्यामुळे जेसिका पेगुला हिला आगेकूच करता आली. पेगुला हिच्याकडे ६-२ अशी आघाडी होती. त्यानंतर कमिलाने माघार घेतली. पेगुलाला पुढे चाल देण्यात आली.