टेनिसपटू पेसची अखेर माघार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा लागला, असे त्याने म्हटले आहे.

नवी दिल्ली - दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे हा कटू निर्णय घ्यावा लागला, असे त्याने म्हटले आहे.

पेसला ‘टॉप्स’ योजनेतून यापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यानंतरही या स्पर्धेसाठी त्याने होकार दिला होता. त्याला रोहन बोपण्णाबरोबर खेळायचे होते, पण अखिल भारतीय टेनिस संघटनेने बोपण्णा व दिवीज शरण या प्रमुख खेळाडूंची जोडी बनविली. तशी विनंती त्या दोघांनी केली होती. अशावेळी पेसला रामकुमार किंवा सुमीत नागल यांच्यासह खेळण्याशिवाय पर्याय नसल्याचे कर्णधार झिशान अली यांनी स्पष्ट केले होते. रामकुमार दुहेरीत फारसा खेळत नाही, तर नागलची एकेरीतील कामगिरी खालावली आहे. पेसने स्पष्ट केले की, गेले कित्येक आठवडे मी विनंती करीत होतो. दुसरी जोडी बनविण्यासाठी आपण ‘डबल्स स्पेशालिस्ट’ संघात घेऊ शकत नाही ही फार वाईट गोष्ट आहे.’ क्रमवारीत बोपण्णा (३२), शरण (३८), पेस (७९), जीवन नेदूंचेळीयन (८८), पुरव राजा (९०) अशी भारतीय क्रमवारी आहे. 

यापूर्वी पेस २००६ मध्ये आशियाई स्पर्धा खेळला होता. आशियाई स्पर्धेत पाच सुवर्णपदके त्याने मिळविली आहेत. कारकिर्दीची अखेर ही सोनेरी व्हावी अशी त्याची इच्छा होती. त्याला या वेळी संधी देण्यात आली. 

आपल्या तंदुरुस्तीविषयी बोपण्णा म्हणाला, ‘‘मी आता पूर्ण तंदुरुस्त आहे. माझा फॉर्म आहे की नाही हा येथे चर्चेचा विषय नाही. मी यापूर्वी अनेकदा दुखापतीतून बाहेर आलो आहे. मी शंभर टक्के तंदुरुस्त नसतो, तर येथे आलोच नसतो.’’

पेसशिवाय संघ दाखल
दरम्यान, भारतीय संघ आशियाई गुरुवारी येथे पेसशिवाय दाखल झाला. पेसच्या उपस्थितीबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, संघ व्यवस्थापनाने याविषयी पेसच अधिक सांगू शकतो, असे स्पष्ट केले होते.

झीशान अली म्हणाले, ‘‘पेस का आला नाही हे आपल्याला माहीत नाही. मी त्याच्याशी अखेरचा संवाद साधला तेव्हा सिनसिनाटी स्पर्धा खेळून मग येथे दाखल होईन असे तो म्हणाला होता. पण, तो त्या स्पर्धेतही खेळत नाहीये.’’

Web Title: Tennis player Paes pulls out of Asian Games