एक भयानक सत्य ‘म्युनिच’

गौरव दिवेकर
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये काही स्पर्धा खेळापेक्षा मैदानाबाहेरच्याच घडामोडींमुळे गाजल्या. म्युनिचमध्ये (१९७२) झालेल्या स्पर्धेचे नाव त्यात अग्रस्थानी असेल. १९७२ ची स्पर्धा म्हटल्यावर सगळ्यांत आधी इस्राईली खेळाडूंचे ते दुर्दैवी हत्याकांडच आठवते. 

 

ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये काही स्पर्धा खेळापेक्षा मैदानाबाहेरच्याच घडामोडींमुळे गाजल्या. म्युनिचमध्ये (१९७२) झालेल्या स्पर्धेचे नाव त्यात अग्रस्थानी असेल. १९७२ ची स्पर्धा म्हटल्यावर सगळ्यांत आधी इस्राईली खेळाडूंचे ते दुर्दैवी हत्याकांडच आठवते. 

 

५ आणि ६ सप्टेंबर रोजी म्युनिच स्पर्धेदरम्यान घडलेल्या त्या घटनेविषयी सर्वांना ठाऊक आहेच. ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्राईलच्या पथकातील ११ खेळाडूंचे अपहरण केले आणि तुरुंगात असलेल्या २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली. अखेर त्या दहशतवाद्यांनी त्या खेळाडूंची हत्या केली. त्यानंतर ‘मोसाद’ या इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणेने या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून कसे ठार केले, या प्रतिशोधावर स्टीव्हन स्पिलबर्गने ‘म्युनिच’ हा सिनेमा तयार केला. हा चित्रपट आधारित होता Vengeance या पुस्तकावर. जॉर्ज जोनस यांनी या पुस्तकामध्ये इस्राईलच्या त्या गोपनीय मोहिमेविषयी सविस्तर लिहिले आहे. ही माहिती सत्य असल्याचा दावा लेखकाने केला असला तरीही, इस्राईलच्या अनेक अधिकाऱ्यांनी याचा उल्लेख ‘अतिरंजित’ असाच केला आहे. त्यामुळे ‘म्युनिच’मधल्या चित्रणावरही काहींनी नाराजी व्यक्त केली होती. यातील काही घटना किंवा दृष्ये काल्पनिक असली तरीही अनेक पात्रे, घटना सत्य आहेत. आजही अनेक चित्रपटविषयक संकेतस्थळे किंवा मासिकांच्या ‘बेस्ट’ चित्रपटांच्या यादीत ‘म्युनिच’चे नाव आहे. 

भर ऑलिंपिक स्पर्धेत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यावर तयार झालेला ‘म्युनिच’ हा एकमेव चित्रपट नक्कीच नाही. तुम्हाला डॉक्‍युमेंट्री पाहण्याची आवड असेल, तर ‘वन डे इन सप्टेंबर’ ही डॉक्‍युमेंट्री आवर्जून पाहा. १९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉक्‍युमेंट्रीचे दिग्दर्शन केव्हिन मॅकडोनाल्ड यांनी केले होते. अमेरिकेतील दिग्गज अभिनेते मायकेल डग्लस यांनी या दीड तासांच्या डॉक्‍युमेंट्रीतील संपूर्ण निवेदन केले आहे. २००० मध्ये या डॉक्‍युमेंट्रीला ‘ऑस्कर’ही मिळाला. 

या डॉक्‍युमेंट्रीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इस्राईली खेळाडूंवर केलेल्या हल्ल्यामधील एकमेव जिवंत दहशतवादी जमाल अल-गशे याची पहिली मुलाखत. या डॉक्‍युमेंट्रीमध्ये मॅकडोनाल्ड यांनी त्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान केलेली चित्रिकरणेही वापरली आहेत. यातून त्या स्पर्धेला किती ढिसाळ सुरक्षा व्यवस्था होती, याचा पंचनामाही त्यांनी यात केला आहे. इतकेच नव्हे, तर अपहृत खेळाडूंची सुटका करण्यासाठी जर्मन सुरक्षा दलांनी आखलेली योजनाही किती कुचकामी आणि चुकीची होती, हेदेखील त्यात मॅकडोनाल्ड यांनी दाखवून दिले आहे.

इस्राईलचा, जर्मनीतील ऑलिंपिकचा किंवा म्युनिचचा उल्लेख झाला, की हे भयानक हत्याकांड आठवतंच. त्या वेळी नेमकं काय झालं होतं, हे जाणून घेण्यासाठी ‘वन डे इन सप्टेंबर’ची मदत होईल आणि या घटनेचे टिपिकल चित्रपटात्मक वर्णन पाहण्याचा अनुभव ‘म्युनिच’ देईल.

Web Title: A terrible truth 'Munich'