कसोटी क्रिकेट संपल्यात जमा - मॅक्‌लम 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

कसोटीला भविष्यच उरले नाही. 
"आयसीसी'ने अलीकडेच आयर्लंड आणि अफगाणिस्तान देशांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा दिला आहे. यावर मॅक्‌लम म्हणतो, ""कसोटी क्रिकेट जपण्यासाठी त्यांचे प्रयत्न चांगले आहेत; पण ज्या क्रिकेटला आता भविष्यच उरलेले नाही, त्या क्रिकेटमधील संघ वाढवून काय मिळणार आहे.'' 

नवी दिल्ली - अलीकडचे क्रिकेटपटू जेव्हा आम्ही पांढऱ्या चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करत आहोत, असे बोलतात तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात; पण न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्‌लम यानेही या भूमिकेत आपली हाक मिसळली असून, एक पाऊल पुढे जात त्याने कसोटी क्रिकेट संपल्यात जमा असल्याचे मत मांडले आहे. 

कसोटी क्रिकेटविषयी बोलताना एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मॅक्‌लमने आपली मते परखडपणे मांडली. तो म्हणाला,""टी-20 क्रिकेट सामन्यांच्या वाढत्या माऱ्यामुळे कसोटी क्रिकेट वाचवणे आता कठीण झाले आहे. भविष्यात कसोटी क्रिकेट राहणारच नाही, या भूमिकेवर मी ठाम आहे. क्रिकेटपटू सोडा, आता क्रिकेट चाहत्यांनाही टी-20 क्रिकेट पाहणे अधिक आवडते. खरे क्रिकेट यामुळे संपत चालल्याची भावना चिंता करणारी असली, तरी हे सत्य आता स्वीकारायलाच हवे.'' 

क्रिकेट आता फुटबॉलच्या वाटेवर चालत आहे असेही मत त्याने मांडले. तो म्हणाला, ""फुटबॉलमध्ये जशी क्‍लब संस्कृती रुजू आहे, तशी आता टी-20 मुळे क्रिकेटपटू रुजत आहे. फुटबॉलमध्ये जसे खेळाडू प्रथम क्‍लबची प्रामाणिक राहतात आणि नंतर आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या सामन्यांचा विचार करतात. तसेच भविष्यात क्रिकेटपटूही त्या वळणावर जातील. ही क्‍लब संस्कृती आता इतकी रुजणार आहे की भविष्यात आपल्या खेळाडूला कसोटी खेळण्यासाठी मुक्त करण्यासाठी फ्रॅंचाईजींना गळ घालावी लागेल.''

Web Title: test cricket wont be around in time says brendon mccullum