देशात चांगले प्रतिस्पर्धी नसल्याची सुशील, साक्षीची खंत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली असताना भारतीय कुस्ती संघास टाटा मोटर्सच्या रूपाने भक्कम पुरस्कर्ते लाभले, त्यामुळे भारतीय कुस्तीगीर खूश होते, पण त्याच वेळी सुशील कुमार आणि साक्षी मलिक या भारतातील अव्वल कुस्तीगिरांना सरावासाठी देशात चांगले सहकारी मिळत नाहीत, फारसे आव्हान लाभत नाही याची खंत वाटत होती. 

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली असताना भारतीय कुस्ती संघास टाटा मोटर्सच्या रूपाने भक्कम पुरस्कर्ते लाभले, त्यामुळे भारतीय कुस्तीगीर खूश होते, पण त्याच वेळी सुशील कुमार आणि साक्षी मलिक या भारतातील अव्वल कुस्तीगिरांना सरावासाठी देशात चांगले सहकारी मिळत नाहीत, फारसे आव्हान लाभत नाही याची खंत वाटत होती. 

सलग तीन ऑलिपिंक स्पर्धेत भारतास पदक जिंकून दिलेल्या कुस्ती या खेळाला अखेर पुरस्कर्ते लाभले, अशी भावना साक्षीने व्यक्त केली. आशियाई स्पर्धेसाठी सुशील गेल्या काही महिन्यांपासून प्रामुख्याने जॉर्जियात सराव करीत आहे, याकडे लक्ष वेधल्यावर सुशीलने आपल्याकडे सरावासाठी चांगले सहकारी मिळत नाहीत. त्याउलट जॉर्जियात सरावासाठी तोलामोलाचे प्रतिस्पर्धी लाभतात, त्यामुळे सर्व प्रकारचा सराव चांगल्या प्रकारे करता येतो, असे सांगितले. साक्षीदेखील सुशीलच्या या मताशी सहमत होती. स्पर्धेपूर्वीचा सराव महत्त्वाचा असतो. आपल्याकडे सरावात चांगले सहकारी मिळत नाहीत. परदेशात गेल्यावर हे प्रतिस्पर्धी मिळतात. त्याचा नक्कीच मुख्य स्पर्धेत फायदा होतो, असे साक्षीने सांगितले. 

भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यकारी सचिव विनोद तोमर यांनीही याच प्रकारची कबुली दिली. परदेशात ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी निवड चाचणी होत असते. एक-दीड वर्षापूर्वी मिळवलेल्या कोट्यावरून त्या खेळाडूला ऑलिंपिकसाठी पाठवणे कितपत योग्य आहे. या प्रश्‍नावर बोलताना त्या कुस्तीगिराने कोटा मिळवलेला असतो. ते त्याचे कौशल्य आहे. भारतात अनेक गटांत चुरसच दिसत नाही. अनेक लढती एकतर्फी होतात. आपल्याकडे जपानसारखी परिस्थिती नाही, असे त्यांनी सांगितले. 

टाटा मोटर्सने तीन वर्षांसाठी भारतीय कुस्ती महासंघाबरोबर अधिकृत पुरस्कर्ते म्हणून करार केला. मात्र, पुरस्काराची रक्कम जाहीर करण्यात आली नाही. अर्थात, क्रिकेटखेरीज होणारा हा मोठा करार असेल असे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे प्रमुख गिरीश वाघ यांनी सांगितले. हा करार कोट्यवधी रकमेचा असेल, असे सांगितले जात आहे. या करारानुसार भारतीय संघांनाच नव्हे, तर देशातील अव्वल पन्नास कुस्तीगिरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. 

ऑलिंपिक रौप्यपदक जिंकले असले तरी, आशियाई क्रीडा स्पर्धेत अद्याप सुवर्णपदक जिंकता आलेले नाही, हे सलत आहे. त्यामुळेच मी खेळत आहे असे नव्हे; मला कुस्ती खेळायला आवडते. शरीर साथ देत आहे, तोपर्यंत खेळत राहणार. 
- सुशील कुमार 

Web Title: there is not a good rival in the country - sushil