ऑलिंपिक विजेत्याविरुद्ध खेळण्याचे दडपणच नव्हते...

गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्याविरुद्ध लढत असल्याचा फारसा विचारही केला नाही. केवळ व्यूहरचेनुसार खेळ करण्याचे ठरवले. त्याचबरोबर चुका टाळण्यात यश आल्याचा फायदा झाला, असे अश्‍विनी पोनप्पाने सांगितले. अश्‍विनीने दुहेरीच्या दोन लढती जिंकल्यामुळे भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियास पराजित केले. 

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता समोर आहे, याचा जास्त विचार केला असता तर त्याचे दडपण आले असते. किंबहूना त्याच्याविरुद्ध मुक्तपणे खेळू, असाच विचार केला. त्यामुळे दडपणच आले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डेन्मार्कविरुद्धच्या लढतीप्रमाणे चुकाही झाल्या नाहीत, असे अश्‍विनीने सांगितले. अश्‍विनी - सात्विकराजने मिश्र दुहेरीत ऑलिंपिक विजेत्या तोंतोवी अहमद याला हार पत्करण्यास भाग पाडले. 

अश्‍विनीबरोबर खेळल्याचा मला खूपच फायदा होत आहे, असे तिचा मिश्र दुहेरीतील सहकारी सात्विकराज याने सांगितले. इंडोनेशियाच्या संघ व्यवस्थापिका सुसी सुसांती यांनी पराभवासाठी दुहेरीस जबाबदार धरले. दुहेरीत हार पत्करावी लागल्यावर एकेरीतील यशाची अपेक्षाच धरता येत नाही, असे त्यांनी सांगितले. सिंधूने महिला एकेरीची लढत जिंकत भारताचा विजय निश्‍चित केला. भारतास विजयी गुण मिळवून दिला त्याचा नक्कीच आनंद आहे. विजयाचा आत्मविश्‍वास होता; पण कधीही गाफील नव्हते. आघाडी घेतल्यावरही विजय गृहीत धरला नाही. प्रत्येक गुणास तेवढेच महत्त्व दिले, असे तिने सांगितले.

भारताची गटातून आगेकूच
इंडोनेशियाने डेन्मार्कला ३-२ असे पराजित केले, तरीही त्यांचे सुदीरामन कप स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपले आणि भारताने गटातून आगेकूच केली. डेन्मार्क, भारत व इंडोनेशियाने प्रत्येकी एक सामना जिंकला; पण सामन्यातील लढतीत डेन्मार्क (६-४) आणि भारताने (५-५) इंडोनेशियाला (४-६) मागे टाकले. गेम सरासरीतही डेन्मार्क (१४-१२) आणि भारत (१२-११) हे  इंडोनेशियापेक्षा (११-१४)  सरस ठरले.