‘विराटराजा’ला साथ द्या... आव्हान ठेवा

शैलेश नागवेकर 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

मुंबई - एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीत वेस्ट इंडीज भले तळास असतील; पण त्यांनी बलाढ्य भारतीयांची झोप उडवली. आता मालिकेतील आव्हान टिकवण्याची वेळ ठाकली असताना भारतीय संघ अजून मधल्या फळीतील समतोल साधण्यास चाचपडत आहे. आज (ता. २९) चौथ्या सामन्यासाठी केदार जाधव उपलब्ध आहे, हे सुदैव; पण त्याच्या समावेशासाठी कोणाला वगळायचे, हे कोडे टीम इंडियाला सोडवावे लागेल. 

मुंबई - एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीत वेस्ट इंडीज भले तळास असतील; पण त्यांनी बलाढ्य भारतीयांची झोप उडवली. आता मालिकेतील आव्हान टिकवण्याची वेळ ठाकली असताना भारतीय संघ अजून मधल्या फळीतील समतोल साधण्यास चाचपडत आहे. आज (ता. २९) चौथ्या सामन्यासाठी केदार जाधव उपलब्ध आहे, हे सुदैव; पण त्याच्या समावेशासाठी कोणाला वगळायचे, हे कोडे टीम इंडियाला सोडवावे लागेल. 

एरवी मायदेशात वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीयांसमोर मालिकेत आव्हान टिकवण्याची वेळ आली आहे. पहिल्या दोन सामन्यांत गोलंदाजीतील अपयश आणि शनिवारच्या पुण्यातील सामन्यात मधल्या फळीचा कमकुवतपणा अधोरेखित झाला. एकटा विराट लढतोय. सलग तीन शतके करण्याचा विक्रमही करतोय; पण त्याला मधल्या फळीची साथच नाही. त्यामुळे उद्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हे कोडे सुटले नाही, तर भारताचा मालिका विजय अवघड होईल.

सैरभैर मानसिकता
हेटमेर आणि होपने गोलंदाजीतील दुबळेपणा स्पष्ट केल्यामुळे भुवनेश्‍वर आणि बुमरास पाचारण करण्यात आले. केदार जाधवने टीका केल्यानंतर अखेरच्या दोन सामन्यांसाठी त्याची अतिरिक्त खेळाडू म्हणून निवड झाली. या दोन घडामोडी सैरभैर मानसिकता दाखवणाऱ्या आहेत. बुमराच्या भेदकतेमुळे पुण्यात त्रिशतकी आव्हान मिळाले नाही; पण वन मॅन आर्मी विराटला मधल्या फळीत साथ देणारा कोणीच नसल्यामुळे हार स्वीकारण्याची वेळ आली.

केदारचा समावेश; पण वगळणार कोणाला?
पुण्यातील पराभवानंतर कोहलीने मुंबईतील सामन्यात केदार जाधवच्या समावेशाचे संकेत दिले. त्यामुळे तो उद्या खेळणार, हे निश्‍चित आहे; पण त्यासाठी वगळणार कोणाला? हा प्रश्‍न आहे. खलील अहमदऐवजी केदार जाधव हा बदल संभवतो. पाच निव्वळ गोलंदाज खेळवूनही विंडीजचा तोफखाना रोखताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे गोलंदाज कमी करण्याची चूक केली जाणार का? अन्यथा केदारला पूर्ण दहा षटके गोलंदाजी करावी लागेल आणि त्यातच एखाद्या गोलंदाजाला मार पडला, तर विराटकडे सहावा पर्यायी गोलंदाज नाही. याचाही विचार करावा लागेल.

धोनीचा पाय खोलात?
ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमधून आता निरोप देण्यात आलेल्या धोनीसमोर विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळायचे असेल, तर प्रत्येक एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत चमक दाखवणे अनिवार्य आहे. त्यातच तिसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे धोनीसाठी अग्निपरीक्षेसारखीच वेळ असेल.

उष्णतेचे आव्हान
मुंबईतील उकाडा कमालीचा वाढत आहे. दुपारचे तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके जात आहे. सामना सूर्य मध्यानी असताना सुरू होत आहे. त्यातच ब्रेबॉर्न बंदिस्त आहे. त्यामुळे मैदानावर दुपारी, तसेच सायंकाळी आर्द्रतेचा त्रास जाणवू शकतो. अशा प्रतिकूल वातावरणात खेळण्याचे आव्हान दोन्ही संघांसमोर असेल. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीस प्राधान्य असेल.

Web Title: Time for the challenge India in the series