फुटबॉल सिस्टीम बदलण्याची हीच योग्य वेळ; बायचुंग भुतिया

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत संघटनेवरील प्रशासकीय समितीचे हक्क काढून टाकले
time to change Football system says Bhaichung bhutia welcoming fifa decision to lift ban
time to change Football system says Bhaichung bhutia welcoming fifa decision to lift bansakal

नवी दिल्ली : फिफाने भारतावरील बंदी उठवल्याचे माजी कर्णधार आणि आता संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या बायचुंग भुतियाने स्वागत केले. भारतीय फुटबॉलमधील सिस्टीम बदलण्याची ही योग्य वेळ आहे, असेही तो म्हणाला. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत संघटनेवरील प्रशासकीय समितीचे हक्क काढून टाकले. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. फिफाही भारतीय संघटनेतील बदलाबाबत आश्वस्त झाली. परिणामी ऑक्टोबर महिन्यात देशात होणाऱ्या १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला.

फिफाने भारतावरील बंदी उठवणे, ही फारच आनंदाची घटना आहे. हा भारतीय फुटबॉलचा विजय आहे, असे सांगून भुतिया म्हणाला, मला जास्त आनंद ज्युनियर खेळाडूंसाठी झाला आहे. ते आता निर्धास्तपणे खेळू शकतात आणि देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचीही इच्छा कायम ठेऊ शकतात. भुतिया येत्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार आहे. ही निवडणूक २ सप्टेंबर रोजी होत आहे. फिफाच्या बंदीसारखे प्रकार यापुढे होऊ नये म्हणून प्रशासनात बदल होण्याची गरज असल्याचे भुतियाने सांगितले. तो पुढे म्हणाला, खरे तर हा आपल्या सर्वांना धडा आहे. संघटनेतील प्रशासनात बदल आणि सुधारणा होण्याची गरज आहे. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला भुतिया हा पहिला खेळाडू आहे. २०११ मध्ये तो निवृत्त झाला.

योग्य सिस्टिम तयार करण्यात आली, तर आपण एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो; पण त्यासाठी योग्य व्यक्ती महत्त्वांच्या पदावर असायला हवी. केवळ सिनियर संघच नव्हे, तर वयोगटातील संघही येत्या काळात विश्वकरंडकसारख्या स्पर्धांसाठी पात्र ठरू शकतील, असा विश्वास भुतियाने व्यक्त केला. भारतीय फुटबॉलची १६ वर्षे सेवा करणाऱ्या भुतियाला २०१९ मध्ये एशियन फुटबॉल कॉन्फडरेशन हॉल ऑफ फेम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत भुतियासमोर माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांचे अध्यक्षपदासाठी आव्हान असणार आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com