वादळापूर्वीची विश्रांती; आज भारत वि. रशिया 

Today India vs Russia
Today India vs Russia

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आतापर्यंत जागतिक बुद्धिबळावर वर्चस्व गाजवणाऱ्या रशियाशी भारतीय पुरुष लढतील, तर महिला अमेरिकेला टक्कर देतील. एका वेळी दोन महासत्तांशी झालेली झुंज म्हणजे भारत आता बुद्धिबळातील महासत्ता बनत चालल्याचे ताजे उदाहरण आहे! पोलंडकडून हरलेल्या रशियाला बलवान भारताशी लढणे आवडणार नाही; परंतु हे युद्ध टाळणेही शक्‍य नव्हते. प्रत्येक संघाला वर जाण्यासाठी आपल्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला हरवावे लागते. स्विस पद्धतीच्या साखळी सामन्याचे हे एक वैशिष्ट्य असते.

महिलांना आता अमेरिकेशी लढून पुरुषांच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. अमेरिकेच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्या एकही खेळाडूचा जन्म अमेरिकेत झालेला नाही. असा पहिलाच संघ या ऑलिंपियाडमध्ये खेळात असेल; परंतु बलाढ्य भारताविरुद्ध त्यांची डाळ शिजणार नाही असे वाटते. फक्त द्रोणावली हरिकाचा फॉर्म हीच भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरेल.

आनंद आणि कार्याकीन यांच्यातील लढत रंगतदार ठरेल यात वाद नाही. आनंदचे आणि भारताचे दुर्दैव म्हणजे त्याला बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध काळ्या सोंगट्यांनी खेळावे लागते. आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये आनंद पांढऱ्या सोंगट्या घेऊन कार्याकीनशी एकदाही हरलेला नाही; पण त्याला काळ्या सोंगट्यांनी पाच वेळा हात दिला असून, कार्याकीनने तीन वेळा पांढऱ्या सोंगट्यांनी आनंदवर मात केली आहे. थोडक्‍यात, आनंदला चांगली संधी आहे. 

विदितसमोर क्रामनिक 
आनंदप्रमाणे नाशिककर विदित गुजराथीला काळ्या मोहऱ्यांकडून बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तोंड द्यावे लागते. विदितचा खेळ चंद्राच्या कलेप्रमाणे सतत बहरात चाललेला आहे; पण आज त्याची गाठ आहे ती माजी जगज्जेत्या व्लादिमीर क्रामनिकशी! जागतिक बुद्धिबळाच्या पटावर उगवलेल्या या ताऱ्या विरुद्ध खेळताना दडपण असेल ते क्रामनिकवर.

थोडक्‍यात, दोन्ही भारतीय संघांची लढत आहे ती बलाढ्य देशांशी. रशियाला विशेष करून हा सामना जिंकणे महत्त्वाचे असेल. रशियाचे प्रशिक्षक आंद्रे फिलाटॉव आणि भारतीय प्रशिक्षक रमेश यांची झोप उडाली असणार हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com