साताऱ्यात मॅरेथॉनदरम्यान कोल्हापूरच्या धावपटूचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात मॅरेथॉनदरम्यान कोल्हापूरच्या धावपटूचा मृत्यू
साताऱ्यात मॅरेथॉनदरम्यान कोल्हापूरच्या धावपटूचा मृत्यू

साताऱ्यात मॅरेथॉनदरम्यान कोल्हापूरच्या धावपटूचा मृत्यू

सातारा : येथील सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे आयोजित सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत आज सकाळी अंतिम रेषेपासून थोड्याच अंतरावर कोल्हापूरच्या एका धावपटूचा मृत्यू झाला. राज कांतीलाल पटेल (वय ३०, रा. कृष्णकुंज, रुईकर कॉलनी कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. फुफ्‍फुसाला आलेली सूज व हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी राज व त्याचे मित्र मोटारीने शनिवारी (ता. १७) दुपारीच साताऱ्याला आले होते. पोलिस कवायत मैदानावरून सकाळी साडेसहाला मॅरेथॉनला सुरुवात झाली.

यवतेश्वर येथून माघारी फिरून स्पर्धक पुन्हा पोलिस कवायत मैदानावर येणार होते. राजही त्यात सहभागी होता. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजून २८ मिनिटांच्या सुमारास तो पोलिस कवायत मैदानापासून जवळच असलेल्या पारंगे चौकापर्यंत पोचला होता. या ठिकाणी त्याला चक्कर आल्यासारखे होत होते. त्यामुळे काही स्पर्धकांनी त्याला थांबण्याचा सल्ला दिला; परंतु, अंतिम रेषा नजरेच्या टप्‍प्यात आल्याने त्याचा धावण्याचा वेग वाढला होता. तो, राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर येताच खाली कोसळला. संयोजकांमध्ये डॉक्टर्स असल्याने त्यांनी व वैद्यकीय पथकाने तातडीने तेथे धाव घेतली. त्याला तातडीने येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याची पत्नी व नातेवाईक दुपारी साताऱ्यात आले होते. शवविच्छेदनानंतर दुपारी अडीचच्या सुमारास मृतदेह कोल्हापूरला नेण्यात आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

आयर्नमॅनसाठी सुरू होता सराव
राज बॅडमिंटन खेळाडू तसेच धावपट्टू होता. यापूर्वी त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. गेल्या चार वर्षांपासून त्याने सातत्याने सराव सुरू केला होता. सध्या तो आयर्नमॅन स्पर्धेसाठी तयारी करीत होता. तो, कारखानदार होता. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचा कारखाना आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी व एक वर्षाचा मुलगा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26501 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..