"टॉप टेन' महिला एकेरीत "फ्लॉप' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

सातव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाला विंबल्डनच्या महिला एकेरीत नेदरलॅंड्‌सच्या किकी बर्टेन्सने दोन सेटमध्ये हरविले. याबरोबरच महिला एकेरीत "टॉप टेन'पैकी आव्हान बाकी असलेली अखेरची मानांकितही गारद झाली. 

लंडन- सातव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाला विंबल्डनच्या महिला एकेरीत नेदरलॅंड्‌सच्या किकी बर्टेन्सने दोन सेटमध्ये हरविले. याबरोबरच महिला एकेरीत "टॉप टेन'पैकी आव्हान बाकी असलेली अखेरची मानांकितही गारद झाली. 

किकी जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर आहे. तिला विसावे मानांकन आहे. तिने चौथ्या फेरीत 6-3, 7-6 (7-1) असा विजय मिळविला. तिसऱ्या फेरीत तिने पाच वेळच्या विजेत्या व्हीनस विल्यम्सला हरविले होते. व्हीनसला नववे मानांकन होते. "टॉप टेन'पैकी अग्रमानांकित सिमोना हालेप, मारिया शारापोवा, पेट्रा क्विटोवा, स्लोआनी स्टीफन्स यांचे आव्हान पहिल्याच आठवड्यात आटोपले. 

आता 11वे मानांकन असलेली जर्मनीची कॅरोलिन वॉझ्नीयाकी ही सर्वोत्तम मानांकित खेळाडू उरली आहे. 32 जणींच्या मानांकन यादीतील केवळ पाच जणींचे आव्हान बाकी आहे. 

किकीने 2016च्या फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. येथे तिने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. ती 26 वर्षांची आहे. गेल्या वर्षी टेनिस खेळण्याचा उत्साहच कमी झाल्यामुळे तिने निवृत्तीचा विचार केला होता. आता मात्र ती 11 वर्षांत येथे उपांत्यपूर्व फेरी गाठलेली पहिलीच डच महिला ठरली. यापूर्वी मिकाएला क्रेज्जेकने ही कामगिरी केली होती. 

या निकालामुळे दोन नंबरच्या कोर्टवर आणखी एक धक्कादायक निकाल लागला. किकी प्रामुख्याने क्‍ले-कोर्ट स्पेशालिस्ट आहे. प्लिस्कोवा पूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल होती. 2016च्या अमेरिकन ओपनमध्ये तिने अंतिम फेरी गाठली होती. गेल्या पाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत मात्र तिला दुसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. ग्रास कोर्टवरील इतर स्पर्धांत चांगली कामगिरी केल्यामुळे या वेळी तिच्याकडून आशा होत्या.

Web Title: Top Ten Womens flop in wimbaldan