सदाबहार ट्रेकर महाजन यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - गिर्यारोहकांचे आयडॉल, सिंहगडाचे वारकरी नारायण कृष्णा ऊर्फ आबासाहेब महाजन (वय ९७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे व दोन मुली आहेत.

पुणे - गिर्यारोहकांचे आयडॉल, सिंहगडाचे वारकरी नारायण कृष्णा ऊर्फ आबासाहेब महाजन (वय ९७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे व दोन मुली आहेत.

ते पुणे माउंटेनियर्सचे अध्यक्ष होते. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काम केले. नगर रस्त्यावरील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या नगरवाला शाळाच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या सरांनी संपूर्ण आयुष्य गिर्यारोहणासाठी समर्पित केले होते. ९६व्या वर्षापर्यंत दर रविवारी त्यांची सिंहगडाची वारी ठरलेली असायची. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडून झाल्यावर त्यांनी हिमालयामध्ये अनेक मोहिमा यशस्वी केल्या. पुढे काही दशकांमध्ये लेह-लडाखच्या उत्तर हिमालयापासून ते ईशान्य भारतातील पूर्व हिमालयापर्यंत त्यांनी ट्रेकिंग केले. काही वर्षांपूर्वी त्यांनी वयाच्या ८७व्या वर्षी लोणावळ्याजवळ पॅरासेलिंग करत लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नाव नोदविले. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग व ‘गिरीमित्र’ हे जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाले. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले, तेव्हा विविध मान्यवर उपस्थित होते. येत्या रविवारी सायंकाळी सहा वाजता कलाप्रसाद मंगल कार्यालयात शोकसभा होईल.

Web Title: tracker narayan mahajan dies