'आता संपवा...' ब्रिजभूषण सिंहवर IOA च्या कारवाईनंतर क्रीडामंत्र्यांनी पैलवानांना केले आवाहन | Anurag Thakur on Wrestlers Protest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Thakur on Wrestlers Protest

Wrestlers Protest: 'आता संपवा...' ब्रिजभूषण सिंहवर IOA च्या कारवाईनंतर क्रीडामंत्र्यांनी पैलवानांना केले आवाहन

Anurag Thakur on Wrestlers Protest : 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या मागण्या हळूहळू पूर्ण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथम भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा एफआयआर दाखल करण्यात आला.

दुसरीकडे आयओएच्या निर्णयानंतर शनिवारी तदर्थ समितीने महासंघाचे सर्व कामकाज आपल्या हाती घेतले. त्यामुळे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आता कुस्तीपटूंना संप मागे घ्यायचे आवाहन केले आहे.

हमीरपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अनुराग ठाकूर यांनी याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, 'एक समिती स्थापन केली आहे जी त्यांचे म्हणणे ऐकत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्थापन केलेली तदर्थ समिती कुस्ती महासंघाचे काम पाहत आहे. खेळाडूंच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत.खुद्द क्रीडा मंत्रालयाने जानेवारी महिन्यात निरीक्षण समिती स्थापन केली होती.

आंदोलनवर बसलेल्या दिग्गज पैलवानांना आवाहन करून ते म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयची नोंद केली असून त्यांचे जबाब घेत आहेत. दंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही घेण्यात येत आहेत. पैलवानांचा देशाच्या कायद्यावर विश्वास असायला हवा आणि त्यांनी हा संप थांबवावा.

कुस्तीपटूंनी राऊस अॅव्हेन्यू कोर्टात केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांकडून तपासाची सद्यस्थिती मागवण्यात आली होती. अहवाल देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. अल्पवयीन तक्रारदाराचा जबाबही न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे. पैलवान अजूनही समाधानी नाहीत. ब्रिजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत संप करणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही ते सातत्याने सांगत आहेत.