महिला फुटबॉल विश्वकरंडक : अमेरिकेचेच विजेतेपद 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

महिला विश्‍वकरंडक फुटबॉलमध्ये अमेरिकेने विजेतेपद कायम राखले. अंतिम सामन्यात मेगन रॅपिनोएची पेनल्टी आणि रोझ लॅव्हल्ले हिचा सुरेख मैदानी गोल याच्या जोरावर अमेरिकेने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात नेदरलॅंडसचा 2-0 असा पराभव केला. 

लियॉन : महिला विश्‍वकरंडक फुटबॉलमध्ये अमेरिकेने विजेतेपद कायम राखले. अंतिम सामन्यात मेगन रॅपिनोएची पेनल्टी आणि रोझ लॅव्हल्ले हिचा सुरेख मैदानी गोल याच्या जोरावर अमेरिकेने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात नेदरलॅंडसचा 2-0 असा पराभव केला. 

सामन्याचा पूर्वार्धात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. अमेरिकेच्या वेगवान खेळाला नेदरलॅंडसने चोख प्रत्युत्तर दिले होते. विशेषतः त्यांची गोलरक्षक सारी व्हॅन व्हिनेनडाल हिने सातत्याने अमेरिकेची आक्रमणे शिताफीने थोपवून धरली. अखेर सामना सुरू झाल्यावर साधारण तासाभराने रॅपिनोए हिने अमेरिकेला आघाडीवर नेले. या वेळी फ्रान्सच्या पंच स्टेफानी फ्रापार्ट यांनी कॉर्नरची खूण केली. मात्र, अमेरिकेने या निर्णयाला आव्हान दिले. "वार'चा उपयोग केल्यावर पंचांनी अमेरिकेला पेनल्टी बहाल केली आणि रॅपिनोए हिने गोल करण्याची संधी साधली. सामन्याच्या 61व्या मिनिटाला हा गोल झाला. त्यानंतर आठच मिनिटांनी लॅव्हल्ले हिने आपल्या गुणवत्तेला साजेसा असा मैदानी गोल करून अमेरिकेला 2-0 असे आघाडीवर नेले. या गोलनंतर नेदरलॅंड्‌सने सामन्यात परतण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. 

या विजयाने अमेरिकेने पुन्हा एकदा महिला फुटबॉलमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी चौथ्यांदा विश्‍वविजेतेपद पटकावले. लागोपाठ दोन विश्‍वविजेतेपद मिळविणाऱ्या जील एलिस या पहिल्या प्रशिक्षक ठरल्या. यापूर्वी अशी कामगिरी 1930मध्ये इटलीच्या व्हिट्टोरियो पोझ्झो यांनी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: USA team wins in womens football World Cup