अमेरिकेला 'गोल्डन बॅटन'चा बहुमान 

USA wins Golden Baton at IAAF World Relays
USA wins Golden Baton at IAAF World Relays

नसाऊ (बहामा) - अमेरिकन ऍथलिट्‌सने सलग तिसऱ्या जागतिक रिले स्पर्धेत वर्चस्व कायम ठेवताना सर्वाधिक 60 गुणांसह "गोल्डन बॅटन' पटकावले. दोन दिवसांच्या स्पर्धेत शेवटच्या दिवशी सहापैकी तीन शर्यती जिंकणाऱ्या अमेरिकेने एकूण पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्रॉंझ जिंकले. 

उसेन बोल्ट आणि शेली-ऍन फ्रेझर-प्राइसच्या अनुपस्थितीत जमैकाला (39) दुसरे स्थान मिळाले. ऑस्ट्रेलिया (24) तिसरा आला. शेवटच्या दिवशी महिलांच्या 4-100 मीटर रिले शर्यतीत अमेरिकन धावपटूचे पडणे, त्यानंतर जर्मनीने सुवर्णपदक जिंकणे, पुरुषांच्या 4-200 मीटरमध्ये अमेरिकेला मागे टाकून कॅनडाने सुवर्णपदकाला गवसणी घालणे, 4-800 मीटरमध्ये केनियाला रौप्यपदक मिळणे ही काही वैशिष्ट्ये ठरली. 

दोन्ही गटांत 4-100 व 4-400 मीटर रिले शर्यतीतील प्रथम आठ संघ लंडन येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. अपवाद महिलांच्या 4-100 मीटर शर्यतीत असेल. यात ब्राझील आणि अमेरिका संघाने शर्यत पूर्ण न केल्याने "ब' गटाच्या अंतिम शर्यतीत प्रथम स्थान मिळविणाऱ्या इक्‍वेडोरला लंडनसाठी थेट तिकीट देण्यात आले. यामुळे ब्राझील आणि अमेरिकेला उर्वरित आठ संघांत स्थान मिळविण्यासाठी जागतिक क्रमवारीच्या माध्यमातून पात्रता गाठावी लागेल. 

अमेरिकेचे वर्चस्व 
फेलिक्‍स फ्रान्सिस, ऍशले स्पेन्सर, क्वनेरा हेस आणि नताशा हॅस्टिंगचा समावेश असलेल्या अमेरिका महिला संघाने 3 मिनिटे 24.36 सेकंदात शर्यत पूर्ण करून सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. ही यंदाच्या मोसमातील जगातील आघाडीची वेळही ठरली. पोलंडने आश्‍चर्यकारकरीत्या 3 मिनिटे 24.36 सेकंदात रौप्य जिंकले. जमैकाला ब्रॉंझवर समाधान मानावे लागले. पुरुषांत अमेरिका विरुद्ध बोट्‌स्वाना अशी चुरस पाहायला मिळाली. अनुभवी लॉशॉन मेरिटने अंतिम क्षणी 18 वर्षीय कराबो सिबांदाला मागे टाकून 3 मिनिटे 02.13 सेकंदात अमेरिकेला सुवर्ण मिळवून दिले. बोट्‌स्वानाने 3 मिनिटे 02.28 सेकंदात रौप्य जिंकले. जमैकाला येथेही ब्रॉंझपदक मिळाले. 

जर्मनीचे ऐतिहासिक सुवर्णपदक 
महिलांच्या 4-100 मीटर रिले शर्यतीत गेल्या काही वर्षांपासून अमेरिका विरुद्ध जमैका अशीच चुरस पाहायला मिळत आहे. येथेही अशीच अपेक्षा होती. टिआना बार्टोलेटाने अमेरिकेसाठी वेगवान प्रारंभही केला आणि वळणावर ती अडखळली आणि खाली पडली. त्यामुळे सुवर्णपदक जिंकण्याचे अमेरिकेचे स्वप्न येथेच धुळीस मिळाले. त्यामुळे जमैकाला संधी चालून आली होती; मात्र रेबेका हॅसेने शेवटच्या टप्प्यात भन्नाट वेग घेत जर्मनीला विश्‍व रिले शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. हे जर्मनीचे स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच सुवर्णपदक होय. 

पुरुषांच्या 4-800 मीटर शर्यतीत रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या क्‍लेमंटन मर्फीने रिओतच पाचवे स्थान मिळविणाऱ्या केनियाच्या फर्ग्युसन रोटिचला मागे टाकून अमेरिकेला 7 मिनिटे 13.16 सेकंदांत सुवर्णपदक मिळवून दिले. केनियाला रौप्य आणि पोलंडला ब्रॉंझपदक मिळाले. रिओत शंभर मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या आंद्रे दी ग्रासेचा समावेश असलेल्या कॅनडा संघाने 4-200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. अमेरिकेने रौप्य व जमैकाने ब्रॉंझपदक जिंकले. 

बहामाचा जल्लोष 
स्पर्धेतील शेवटची शर्यत 4-400 मीटर मिश्र शर्यत होती. अमेरिकेने पुरुष व महिलांची 4-400 मीटर रिले शर्यत जिंकल्याने साहजिकच त्यांच्याकडेच सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. बहामाने मात्र योग्य डावपेच वापरत सुवर्णपदक मिळविले. शेवटच्या चारशे मीटरसाठी अमेरिकेतर्फे क्‍लाऊडे फ्रान्सिस होत,त्तिर बहामातर्फे मथायू होता. ज्या वेळी फ्रान्सिसने बॅटन घेतले, त्या वेळी तिच्याकडे तीन सेकंदांची आघाडी होती. दोनशे मीटर अंतर शिल्लक असताना मथायूने फ्रान्सिसला गाठले आणि संपूर्ण रॉबिन्सन स्टेडियम जल्लोषात बुडाले. मथायूने अंतिम रेषा पार केली, त्या वेळी प्रेक्षकांनी बहामाचे राष्ट्रगीत गाण्यास सुरवात केली होती. बहामाच्या विजयात चारशे मीटरची ऑलिंपिक विजेती शॉने मिलर-युबोचाही मोलाचा वाटा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com