लायटनिंग बोल्ट

लायटनिंग बोल्ट

नुकत्याच झालेल्या जमैकाच्या ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धेदरम्यान उसेन बोल्टला दुखापत झाल्याने त्याच्या रिओ ऑलिंपिकमधील सहभागाविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र, त्याचा जमैका संघात समावेश झाल्याने तो रिओत धावणार, हे निश्‍चित झाले. १००, २०० मीटर आणि ४-१०० रिले शर्यतीत तो सुवर्णपदक जिंकेल की नाही, हे फक्त बोल्टच सांगू शकतो. कारण, यंदाच्या मोसमातील त्याची कामगिरी नजरेत भरण्यासारखी झालेली नाही. गतवर्षी बीजिंग येथे झालेल्या विश्‍व अजिंक्‍यपद स्पर्धेपूर्वीही त्याच्या कामगिरीविषयी अशीच शंका घेण्यात येत होती. मात्र, त्याने जस्टिन गॅटलीनचे आव्हान लीलया परतवून लावले आणि विक्रमी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. रिओतही त्याला अशीच विक्रम करण्याची संधी आहे. सलग तीन ऑलिंपिकमध्ये १००, २०० मीटर व रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला धावपटू ठरेल. २९ वर्षीय बोल्ट युवा, ज्युनिअर आणि सीनिअर अशा तिन्ही गटांतील विश्‍व स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जगातील फक्त नऊ धावपटूंपैकी एक आहे. २००१ पर्यंत तो ॲथलेटिक्‍सविषयी फार गंभीर नव्हता. २००२ मध्ये जमैकातच झालेल्या ज्युनिअर विश्‍व स्पर्धेत त्याने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि तिथून त्याने ॲथलेटिक्‍समध्ये लौकिक मिळविण्याचा निर्धार केला. पाब्लो मॅकनिल त्याचे पहिले प्रशिक्षक. २००५ पासून तो ग्लेन मिल्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. सुरवातीच्या काळात २०० व ४०० मीटर धावणारा बोल्ट २००६ पासून गंभीरपणे १०० मीटर शर्यतीत सहभागी होऊ लागला. २००७ च्या ओसाका विश्‍व अजिंक्‍यपद स्पर्धेपासून त्याची वेगवान धाव सुरू झाली; ती आजतागायत कायम आहे.

ॲथलेटिक्‍समध्ये येण्यापूर्वी तो क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूस, फलंदाजीत सचिन तेंडुलकर, मॅथ्यू हेडन आणि ख्रिस गेल यांचा तो चाहता आहे. २०१७ च्या लंडन विश्‍व अजिंक्‍यपद स्पर्धेनंतर आपण स्पर्धात्मक ॲथलेटिक्‍समधून निवृत्त होऊ, असे बोल्टने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे रिओत तो ज्या वेळी आपली शेवटची स्पर्धा पूर्ण करेल, त्या वेळी अख्खे जग उभे राहून या महान स्प्रिंटला अभिवादन करेल, यात शंका नाही.
- नरेश शेळके

उसेन बोल्टची महत्त्वपूर्ण कामगिरी
ऑलिंपिक

१०० मीटर - बीजिंग, लंडन - सुवर्ण
२०० मीटर - बीजिंग, लंडन - सुवर्ण
४-१०० मीटर रिले - बीजिंग, लंडन - सुवर्ण

विश्‍व अजिंक्‍यपद
१०० - २००९, १३, १५ - सुवर्ण
२०० - २००९, ११, १३, १५ - सुवर्ण, ०७ - रौप्य
४-१०० रिले - ०९, ११,१३,१५ - सुवर्ण, ०७ - रौप्य
विश्‍वविक्रम - १०० - ९.५८ सेकंद, २०० मीटर - १९.१९ सेकंद.
पुरस्कार - आयएएएफ ॲथलिट ऑफ दी इअर - २००८, ०९, ११, १२, १३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com