IND vs AUS 3rd Test : कडव्या उस्मान ख्वाजाने वाढवले टेन्शन मात्र रविंद्र जडेजाच्या फिरकीमुळी जीव पडला भांड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia 3rd Test Cricket Score

IND vs AUS 3rd Test : कडव्या उस्मान ख्वाजाने वाढवले टेन्शन मात्र रविंद्र जडेजाच्या फिरकीमुळी जीव पडला भांड्यात

India vs Australia 3rd Test Live Cricket Score : भारताला पहिल्या डावात 109 धावात गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात दमदार सुरूवात केली. मात्र रविंद्र जडेजाने कांगारूंची अवस्था 1 बाद 108 धावांवरून 4 हाद 146 धावा अशी केली.

जडेजाने 60 धावा करून कडवी झुंज देणाऱ्या उस्मान ख्वाजा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथला (26) बाद केले. याचबरोबर ट्रॅव्हिस हेड (9) आणि मार्नस लाबुशाने (31) यांचीही शिकार केली. जडेजाने ऑस्ट्रेलियाचे पहिले चार फलंदाज बाद करत टॉप ऑर्डर उडवली. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 156 धावांपर्यंत मजल मारून पहिल्या डावात 47 धावांची आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर डाव सावरला. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेनने अर्धशतकी भागीदारी रचत चहापानापर्यंत संघाला 1 बाद 71 धावांपर्यंत मजल मारली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचत संघाला 108 धावांपर्यंत पोहचवले. ख्वाजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ही जोडी जडेजाने फोडली. त्याने मार्नसला 31 धावांवर बाद केले.

यानंतर कर्णधार स्मिथने 26 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाच्या फिरकीपुढे त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. यानंतर कॅमेरून ग्रीन आणि पीटर हँट्सकॉम्बने ऑस्ट्रेलियाची आणखी पडझड न होऊ देता. संघाला दिवसअखेर 4 बाद 156 धावांपर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाला दिवसअखेर 47 धावांडी आघाडी मिळाली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून डावखुऱ्या मॅथ्यू कूहमनने भारताच्या भक्कम फलंदाजीला भगदाड पाडले. यानंतर नॅथन लयॉनने त्याला साथ देण्यास सुरूवात केली. भारताकडून रोहित शर्मा (12), शुभमन गिल (21), विराट कोहली (22), श्रीकार भरत (17) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. इतर फलंदाजांनी फक्त हजेरी लावली आणि पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारताची उपहारानंतर 8 बाद 88 धावा अशी अवस्था झाली असताना आजच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी संधी मिळालेल्या उमेश यादवने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने शंभरी पार करून देत भारताची लाज वाचवली. त्याने 12 चेंडूत 17 धावा केल्या.

मात्र कूहमनने यादवची शिकार करत भारताला 9 वा धक्का देत आपली पाचवी शिकार देखील केली. यानंतर सिराज शुन्यावर बाद झाला अन् भारताचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने 16 धावात भारताचा निम्मा संघ गारद केला. तर लयॉनने 35 धावात 3 अन् टॉड मर्फीने 1 बळी टिपला.