ऑस्ट्रेलियन जर्सीवरून दारू कंपनी हद्दपार

टीम ई सकाळ
शुक्रवार, 24 मार्च 2017

अल्कोहोल बनविणाऱया कंपन्यांना ऑस्ट्रेलियन क्रीडा क्षेत्रातून हद्दपार करण्यास सुरूवात झाली आहे. गेली वीस वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रायोजक राहिलेल्या 'व्हीबी' बिअर कंपनीने आता माघार घेण्याचा निर्णय
घेतला आहे. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या पिवळ्या धमक जर्सीवर गेली वीस वर्षे चमकणारा हिरवा-लाल रंगाचा 'व्हीबी'चा लोगो आता गायब होणार आहे. सातत्याने होणाऱया टीकेमुळे बिअर बनविणाऱया कार्लटन अॅन्ड युनायटेड ब्रेवरीज् 'व्हीबी'ने अखेर क्रिकेटच्या मैदानातून माघार घेण्याचे ठरविले आहे. 

ऑस्ट्रेलियातील सर्व स्थानिक क्रिकेट स्पर्धा, ऑस्ट्रेलियात होणाऱया एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियाबाहेर होणाऱया एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 'व्हीबी'चा लोगो अग्रभागी असलेले टी-शर्ट वापरत असे. यासाठी 'व्हीबी'ने पाच वर्षांपूर्वी सुमारे 42 कोटी रूपयांचा प्रायोजकत्वाचा करार क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत केला होता. 

मात्र, डॉक्टर्स, लॉबींग करणारे समुह आणि राजकीय नेत्यांकडून 'व्हीबी'च्या करारावर आक्षेप घेतले जात होते. अल्कोहोल कंपन्यांनी क्रीडा क्षेत्राला प्रायोजित करणे कितपत योग्य आहे, याबद्दल प्रश्न विचारले जात होते. अल्कोहोलचे दुष्परिणाम ठावूक असताना या कंपन्यांचा प्रचार क्रीडापटूंमार्फत करणे अयोग्य असल्याचे म्हणणे मांडले जात होते. 

या पार्श्वभूमीवर यापुढे क्रिकेटचे प्रायोजक म्हणून पुढे न येण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तथापि, क्रीडा क्षेत्रातून पूर्णतः बाहेर न पडण्याचेही कंपनीने ठरविले आहे. कंपनी अन्य ब्रँडचा प्रचार करण्याचा विचार करीत असल्याचे या विषयाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. 'सिडनी मॉर्निंग हेरल्ड' या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

गेल्या वर्षी न्यू साऊथ वेल्समधील नेते माईक बर्ड यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि 'व्हीबी' यांच्यातील करारावर उघड टीका केली होती. 'व्हीबी'चा लोगो असलेला टी-शर्ट घालून आमचा कर्णधार बसतो, तेव्हा खूप अवघड वाटते. आमच्या कर्णधारावर आमचे प्रेम आहे, पण त्याने 'व्हीबी'चे प्रायोजकत्व घ्यावे, ही अडचणीची गोष्ट आहे, असे बर्ड यांनी म्हटले होते. 

अल्कोहोल कंपन्यांनी क्रीडा क्षेत्रात प्रायोजकत्व देऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलियात सध्या कंपन्यांवर आणि संस्थांवर दबाव आणला जात आहे. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे समुह आघाडीवर आहेत. अल्कोहोलच्या दुष्परिणांवर ते जाहीर भाष्य करीत आहेत. रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ फिजिशिअन्स या विख्यात संस्थेने अलिकडेच यासंदर्भात उघड भूमिका घेत अल्कोहोल कंपन्यांना क्रीडा क्षेत्रातून हद्दपार करण्याची मागणी केली होती. ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशनने 2012 च्या अहवालातही अल्कोहोल कंपन्यांना प्रायोजक म्हणून घेऊ नये, अशी सूचना केली होती. 

दृष्टीक्षेपात

  • ऑस्ट्रेलियात वर्षाकाठी अल्कोहोल कंपन्या क्रीडा क्षेत्रातील प्रायोजकत्व मिळविण्यासाठी सुमारे 19 अब्ज रूपये खर्च करतात. 
  • ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज फवाद अहमद याने 'व्हीबी'चा लोगो टी-शर्टवर वापरण्यास नकार दिला होता. मुस्लिम धर्मात अल्कोहोलला परवानगी नसल्याचे कारण त्याने दिले होते. त्याला लोगो न वापरण्याची परवानगी ऑस्ट्रेलियन बोर्डाने दिली होती. 
  • ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा यानेही 2013 मध्ये 'व्हीबी'चा लोगो न वापरण्याचा निर्णय घेता होता. 
  • ऑस्ट्रेलियाने 2015 चा विश्वकरंडक जिंकल्यानंतर कॉमेन्टेटर शेन वॉर्न याने सातत्याने संघातील खेळाडूंना 'आज किती पिणार' असा प्रश्न विचारला होता. त्यावरून टीका झाली होती.
Web Title: VB to give up Australian cricket sponsorship