विदर्भाने इराणी करंडकही राखला

विदर्भाने इराणी करंडकही राखला

नागपूर - पहिल्या डावात मिळविलेल्या ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर यजमान आणि रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकण्याची कामगिरी केली. पाठोपाठ दोन वेळा रणजी व इराणी करंडक जिंकण्याचा दुर्मीळ पराक्रम विदर्भाने केला. यापूर्वी फक्त मुंबई आणि कर्नाटक या दोनच संघांना इराणी करंडक राखता आला आहे. अथर्व तायडे आणि गणेश सतीश यांची अर्धशतके शेवटच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. विदर्भाचा शतकवीर अक्षय कर्णेवार ‘सामनावीर’ ठरला.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विदर्भापुढे जिंकण्यासाठी २८० धावांचे आव्हान होते. हे आव्हान पूर्ण करून निर्णायक विजय मिळविण्यासाठी विदर्भाला फक्त अकरा धावांची गरज असताना पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व जण बुचकळ्यात पडले. ज्या वेळी खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी आणखी अकरा षटकांचा खेळ शिल्लक होता. अखेर विदर्भाचा कर्णधार फैज फजलने याविषयी खुलासा केला. तो म्हणाला, ‘‘आम्ही सतीशच्या शतकाची वाट पाहत होतो. कारण, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेतेपद जवळजवळ निश्‍चित झाले होते. त्यामुळे सतीश बाद होताच खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.’’  

१ बाद ३७ वरून सकाळी अथर्व तायडे आणि संजय रामास्वामी यांनी सावध खेळ करीत डाव पुढे सरकविण्यास सुरुवात केली. संजय संथ खेळत असताना अथर्व धावफलक हलता ठेवत होता. त्याने राहुल चावरच्या गोलंदाजीवर षट्‌कारही खेचला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी केली. अखेर चाहरने रामास्वामीला पायचीत करून शेष भारताला दुसरे यश मिळवून दिले. 

अथर्व आणि गणेश सतीश या जोडीचा जम बसत असताना पुन्हा चाहरने अथर्वला पायचीत करून विदर्भाला तिसरा धक्का दिला. अथर्वने १८५ चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकार व एक षट्‌कार मारला. 

अथर्व बाद झाल्यावर मोहित काळेने गणेश सतीशला मोलाची साथ दिली. दोघांनी ८३ धावांची भागीदारी करून विदर्भाचा विजय निश्‍चित केला. मोहितने पाच चौकारांसह ३७ धावांचे योगदान दिले. 

चहापानानंतर सतीशने वेगाने धावा करण्याचा प्रयत्न केला. विजयासाठी अकरा धावांची औपचारिकता शिल्लक असताना शेष भारताचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने हनुमा विहारीकडे चेंडू दिला आणि पहिल्याच चेंडूवर सतीश बाद झाला. सतीश बाद होताच खेळ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नंदन यांच्या जागेवर शमसुद्दीन
चौथ्या दिवशी सी. के. नंदन यांना चेंडू लागला होता. त्यामुळे त्यांनी पाचव्या दिवशी विश्रांती घेणे पसंत केले. त्यांच्या जागेवर तिसरे पंच शमसुद्दीन हे मैदानावर होते. शमसुद्दीन मैदानावर आल्याने नंदन यांनी तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडली.

दहा लाखांची बक्षीस रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना
इराणी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या खेळाडूंनी मिळणारी पुरस्काराची संपूर्ण रक्कम पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली. ही रक्कम दहा लाख रुपये आहे. हा निर्णय जाहीर करून विदर्भाच्या खेळाडूंनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी दोन्ही संघांतील खेळाडूंनी दंडावर काळ्या पट्ट्या लावून निषेध नोंदविला होता. 

दोन वर्षांत चार महत्त्वपूर्ण करंडक जिंकणे सोपे नाही. प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिल्यानेच हे शक्‍य होऊ शकले. वसीम जाफर आणि उमेश यादव नसताना आपल्याला जिंकायचे आहे, हे खेळाडूंना बजावले होते आणि आम्ही जिंकलो. फैज फजलने अफलातून नेतृत्व केले. त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या कामगिरीनंतर विदर्भाच्या खेळाडूंसाठी भारतीय ‘अ’ नव्हे, तर भारतीय संघाचे दरवाजे उघडतील, अशी आशा करतो. 
-चंद्रकांत पंडित, विदर्भाचे प्रशिक्षक

संक्षिप्त धावफलक 
शेष भारत - पहिला डाव - ३३०
विदर्भ - पहिला डाव - ४२५
शेष भारत - दुसरा डाव - ३ बाद ३७४ घोषित
विदर्भ - दुसरा डाव - १०३.१ षटकांत ५ बाद २६९ (अथर्व तायडे ७२, आर. रामास्वामी ४२, गणेश सतीश ८७, मोहित काळे ३७, राहुल चाहर २-११६, अंकित राजपूत १-४१, धमेंद्र जडेजा १-५९, हनुमा विहारी १-०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com