नियम खेळाडूंच्या हिताचे असावेत - विजय गोयल

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

विनीतच्या प्रकरणात आपण केरळचे मुख्यमंत्री आणि नियंत्रक महालेखापरीक्षक यांच्याशी संपर्क साधणार असून, त्यांना विनीतला पुन्हा सेवेत घेण्यास, तसेच नियमात बदलही करण्यास सांगणार आहोत

नवी दिल्ली - खेळाडूच्या शासकीय सेवेचा जेव्हा प्रश्‍न उपस्थित होतो, तेव्हा नियम खेळाडूच्या हिताचे असायला हवेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रिय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी शुक्रवारी येथे केले.

फुटबॉलपटू सी. के. विनीत याला पुरेशा कार्यालयीन उपस्थितीअभावी लेखापालाची नोकरी गमवावी लागल्याचे वृत्त आल्यानंतर गोयल यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ""खेळाडूंच्या शासकीय सेवेत नियम अडथळा ठरत असतील, तर ते बदलले गेले पाहिजेत. कारण खेळाडूचे पहिले कर्तव्य हे खेळच असते. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्यांची शासकीय सेवेत वर्णी लागते. देशाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांना सतत खेळावे लागते. त्यासाठी शिबिरास उपस्थित राहणे अनिवार्य असते. प्रवासही खूप असतो. त्यामुळे ते कामावर येऊ शकत नाहीत. यासाठी नियमात बदल करण्याची गरज आहे. विनीतच्या प्रकरणात आपण केरळचे मुख्यमंत्री आणि नियंत्रक महालेखापरीक्षक यांच्याशी संपर्क साधणार असून, त्यांना विनीतला पुन्हा सेवेत घेण्यास, तसेच नियमात बदलही करण्यास सांगणार आहोत.''

केंद्र सरकार नेहमीच खेळाडूंचे हित जपणार आहे. खेळाडूंच्या अशा अडचणीच्या प्रसंगात मी जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगून गोयल म्हणाले, ""सरकार खेळाडूंची काळजी घेणाराच विचार करेल. खेळाडूंना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.''

Web Title: Vijay Goel backs C K Vinit