'डोपिंग'प्रकरणी मदत करणारेही ठरणार दोषी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

आम्ही सर्व शक्‍यता पडताळून बघत आहोत. कायदा मंत्रालय आणि अन्य संलग्न संस्थाशी याबाबत चर्चा करत आहोत. "वाडा'नेदेखील यामध्ये सहकार्य करण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - उत्तेजकांचे सेवन हा नुसता फौजदारी गुन्हाच नाही, तर त्यात दोषी आढळणाऱ्यास थेट कारावासाची शिक्षाच सुनावली जाईल, अशा प्रकारचा नवा कायदाच करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी गुरुवारी येथे सांगितले. 

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध संस्थेच्या वतीने आयोजित परिसंवादानंतर गोयल यांनी ही माहिती दिली. उत्तेजकांचे सेवन आता केवळ आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर राहिलेले नसून, त्याचे लोण विद्यापीठ आणि शालेय स्तरावरदेखील पसरू लागल्याची भीती गोयल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ""उत्तेजकांचे सेवन वरिष्ठ खेळाडूंपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. ते कुमार खेळाडूंपर्यंत पोचू लागले आहे. उत्तेजकांचा गैरवापर झपाट्याने पसरू लागला आहे. त्यामुळे केवळ खेळाडूच नाही, तर त्यांना यासाठी सहाय्यभूत असणारे प्रशिक्षक, ट्रेनर, डॉक्‍टर अशा सर्वांनाच दोषी धरून त्यांना थेट कारावासाची शिक्षा सुनावणारा कायदा कसा अस्तित्वात येईल यावर आम्ही विचार करत आहोत.'' 
उत्तेजक प्रकरणात कधी कधी खेळाडू अनवधानाने ओढला जातो. यात कधी प्रशिक्षकाची चूक असते, तर कधी ट्रेनर किंवा डॉक्‍टरांकडून गाफिलपणा दाखवला जातो. पर्यायाने त्याची किंमत खेळाडूला मोजावी लागते. त्यामुळेच उत्तेजक सेवन प्रकरणात सामील असणाऱ्या प्रत्येकालाच आम्ही या कायद्यान्वये एकत्र दोषी धरणार आहोत, असेही गोयल म्हणाले. 

"नाडा'चे संचालक नवीन अगरवाल म्हणाले, ""उत्तेजक चाचणी घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आम्हाला चांगले निकाल मिळू लागले आहेत. खेळाडू दोषी आढळत आहेत, पण त्यांच्यात जागरुकतादेखील निर्माण झाली आहे. दरवर्षी आम्ही सुमारे सात हजार चाचण्या घेतो. आता अशा प्रकरणात प्रशिक्षिक खेळाडूंना चुकीची माहिती देणार नाहीत, हे खरे आव्हान आमच्यासमोर आहे.'' 

उत्तेजकांपासून खेळाडूंना रोखण्यासाठी दोषी व्यक्तींनी थेट कारावासाची शिक्षा सुनावली जाईल, असा कायदा करण्याचा विचार असला, तरी तो कधीपर्यंत आमलात येईल हे निश्‍चित नाही. गोयल म्हणाले, ""आम्ही सर्व शक्‍यता पडताळून बघत आहोत. कायदा मंत्रालय आणि अन्य संलग्न संस्थाशी याबाबत चर्चा करत आहोत. "वाडा'नेदेखील यामध्ये सहकार्य करण्याची गरज आहे. जशी बंदी घालण्यात आलेल्या औषधांची सूची करण्यात आली आहे, तशी जी औषधे खेळाडू घेऊ शकतात अशा औषधांचीदेखील एक सूची करण्याची गरज आहे.'' 

उत्तेजकांविषयी गोयल म्हणतात... 
काही दिवसांपूर्वी 

उत्तेजकाचे सेवन घेतल्याचा शोध घेणारी यंत्रणा भक्कम असल्यामुळे दोषी खेळाडू सहज सापडू शकतो. त्यासाठी उत्तेजक सेवन हा फौजदारी गुन्हा करण्याची गरज नाही. खेळाडूंमध्ये याबाबत जागरुकता निर्माण व्हायला लागली आहे. 

आज... 
उत्तेजक सेवनाचे जाळे आता वरिष्ठ खेळाडूंपर्यंत मर्यादित नाही, तर ते कुमार खेळाडूंपर्यंत पसरले आहे. त्यामुळे त्याला आळा हा बसलाच पाहिजे. यात खेळाडूच नाही, तर त्याचे प्रशिक्षक, ट्रेनर, डॉक्‍टर अशा सर्व घटकांना दोषी धरायला हवे. 

Web Title: Vijay Goel directs NADA, IOA to adopt zero tolerance policy towards doping