बाप से बेटा...

बाप से बेटा...

शूटिंगमध्ये देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणारे राजवर्धनसिंह राठोड यांचा मुलगा मानवादित्य त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून शूटिंगमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत आहे. राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. राजवर्धनसिंह राठोड यांना दुसरे ऑलिंपिक पदक आणणे आता शक्‍य नसले तरी त्यांचा मुलगा मानवादित्य ही कामगिरी करू शकतो, असा विश्‍वास बाळगण्यास हरकत नाही.

राठोड कुटुंब तसे क्रीडाप्रेमीच आहे. मानवादित्य याचा जन्म आणि बालपण सारे शूटिंगभोवतीच गुंफले गेले आहे. त्यामुळे त्याला शूटिंगचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. राजवर्धनसिंह यांनी २०१४ च्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये देशाला डबल ट्रप प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले. त्यानंतर अवघ्या नऊ वर्षांतच मानवादित्यने राष्ट्रीय ज्युनिअर गटाचे विजेतेपद पटकाविताना सुवर्ण जिंकले. मुलाचे पहिले यश पाहून राजवर्धनसिंह यांना तर ऑलिंपिकमध्ये पदक मिळविल्याइतका आनंद झाला होता. मानवची शैली तशीच आहे. एकाग्रता, नजर, हालचाली, स्टाईल यामुळे अनेकांना राजवर्धन यांचा खेळ पुन्हा पाहायला मिळतो, असेच वाटते. लक्ष्याचा वेध घेण्याची त्याची क्षमता आणि तंत्रशुद्धता दिवसेंदिवस अधिक काटेकोर आणि मोठ्या यशाच्या जवळ नेणारी आहे. ज्युनिअर गटात युरोपमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये एकाच वर्षी मानवादित्यने चार सुवर्ण, सहा रौप्य आणि दहा कास्यपदके पटकाविली. त्यातील दोन स्पर्धा जगात सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या जातात. तो मानव किंवा मॉली या टोपणनावाने ओळखला जातो.

राजवर्धन जेव्हा भारतीय वरिष्ठ संघाच्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य होते तेव्हा मानवची राष्ट्रीय ज्युनिअर संघासाठी निवड झालेली होती. मानवने पुढे फिनलॅंड येथे झालेल्या स्पर्धेत शॉटगन प्रकारात रौप्य आणि कझाकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई शॉटगन स्पर्धेत कास्यपदक पटकाविले. राजवर्धन त्यावेळी त्याच्याबद्दल कौतुकाने म्हणाले होते, की त्याला शूटिंगची आवड निर्माण झाली नसती तरच नवल वाटले असते. कारण त्याचे सारे बालपण शूटिंग रेंजवर गेले. त्याच्याभोवती अनेक खेळाडूंचा वावर असायचा. त्यामुळे मी त्याला जबरदस्तीने या क्रीडा प्रकाराकडे वळविण्याची गरज नव्हतीच. तो नैसर्गिकच याकडे आकृष्ट झाला आहे. मानव म्हणतो, ‘‘आमच्या घरामध्येच रेंज आहे. तेथे वडील तासन्‌ तास सराव करायचे. मी ते पाहतच मोठा झालो. मी अनेकदा बंदुकीने सरावाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर वडील फक्त हसून म्हणायचे, की तू अजून लहान आहेस. थोडा मोठा झालास की तुलाही माझ्यासारखा सराव करता येईल. एके दिवशी त्यांनी मला गन भेट दिली. मला ती खूपच आवडली होती.’’

मानवादित्य ज्युनिअर गटातील आता अग्रेसर खेळाडू झाला आहे; पण वैशिष्ट्य असे, की त्याला त्याचे वडील कधीच प्रशिक्षण देत नाहीत. या संदर्भात राजवर्धन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे, की वडील आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांना एकच व्यक्ती पुरेसा न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या नात्यावरही ताण येऊ शकतो. त्याने कोणताही ताण न घेता सराव केला पाहिजे, हीच भूमिका त्याचा प्रशिक्षक न होण्यामागची आहे. गरज पडेल तेव्हा त्याला टिप्स्‌ मात्र देत असतो.

मानव २०१३ पासून विविध स्पर्धांतून सहभागी होत आहे. पहिल्या वर्षी त्याला म्हणावे इतके यश संपादन करता आले नाही; मात्र कठोर सराव आणि वडिलांचे मार्गदर्शन अशा दोन्हींमुळे त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली. त्याचे फळ म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धांतून चमकदार कामगिरी केली आहे. मानवला खरे तर आता वरिष्ठ गटाचे वेध लागले आहेत. या गटातही तो वडिलांप्रमाणेच उत्तुंग कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com