भारताचा नवा लेफ्ट बॅक...

भारताचा नवा लेफ्ट बॅक...

इंडियन सुपर लीगच्या २०१६ च्या हंगामाचा सर्वोत्कृष्ट उभरता खेळाडू म्हणून अठरा वर्षीय जेरी लालरिंझुआला याला गौरविण्यात आले. मिझोरामच्या या खेळाडूने लेफ्ट बॅक या स्थानावरून नितांतसुंदर खेळ केला. त्याच्या चेन्नईयन क्‍लबच्या कौतुकास तो पात्र ठरला. भारताचा उत्तम सेंटर बॅक म्हणून त्याचे भवितव्य मोठे आहे, असे अनेक जाणकारांनी त्याच्याविषयीचे मत व्यक्त केले आहे.  

मिझोरामचा हा खेळाडू लहानपणापासूनच फुटबॉलवेडा आहे. कौटुंबिक स्थिती नसतानाही त्याने आपले फुटबॉलवरील लक्ष हटू दिले नाही. चौदाव्या वर्षी राज्य संघात त्याला दोनदा नाकारण्यात आले होते, तरीही त्याने आपल्या प्रयत्नांमध्ये कसूर ठेवली नव्हती. फ्रान्समधील प्रशिक्षणासाठी निवडलेल्या भारतातील युवा पाच खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. टाटा समूहाने त्याची विद्यार्थिदशेतच फुटबॉल विकासासाठी निवड केली होती. आएसएलमध्ये त्याचे पदापर्ण चेन्नईयन क्‍लबकडून झाले. त्याने पहिल्या पाचही सामन्यांत सामन्यातील उत्कृष्ट÷खेळाडू म्हणून नाव कमाविले. स्पर्धेचा सर्वात चांगला उभरता खेळाडू हा किताबही पटकाविला. आपल्या कामगिरीतील सातत्याने त्याने अनेकांना चकित केले.

हा युवा खेळाडू चमकला तो त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे. लेफ्ट बॅक म्हणून खेळताना प्रतिस्पर्ध्यांच्या चाली निकामी करण्यात याचा उत्तम हातखंडा आहे. त्याच वेळी डाव्या बाजूने आक्रमणासाठी उत्तम स्थिती निर्माण करण्यातही तो चपळता दाखवितो. अनेकता त्याने एका टोकाकडून डीच्या मध्यापर्यंत फटकाविलेले फटके गोल करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याची गती आणि चेंडूवरील नियंत्रण अपेक्षापेक्षा चांगले असल्याने भारताच्या राष्ट्रीय संघात तो लवकरच दमदार कामगिरी करताना दिसेल, याच शंका नाही.

त्याचे चेंडूवरील नियंत्रण अतिशय नैसर्गिक आहे. युवा असल्यामुळे त्याच्या गतीचे अंदाज पटकन येऊ शकत नाही. त्यामुळे डाव्या बगलेतून तो चेंडू घेऊन डी किंवा परिसरात केव्हा धडक मारतो, याची कल्पना येईपर्यंत त्याने चेंडू आक्रमक फळीकडे योग्य संधीसाठी सुपूर्द केलेला असतो. इंडियन सुपर लीगच्या तिसऱ्या हंगामात त्याने गोवा एफसीविरुद्धच्या सामन्यात असाच फ्री किकवर गोल केला आणि इंडियन लीगमध्ये सर्वात कमी वयाचा गोल करणारा तो खेळाडू ठरला. चेन्नईयन गत हंगामाचा विजेता आहे. त्याने पहिल्याच सामन्यात आश्‍वासक कामगिरी दाखविताना अंतिम अकरामध्ये त्याला सतत संधी मिळेल, याची हमी दिली. त्यामुळे संधी त्याच्यासाठी उपलब्ध होत गेली.

चौदा वर्षांखालील राज्य संघात सलग दोनदा प्रवेश नाकारलेल्या लालरिंझुआला फुटबॉलवरील आपले प्रेम सोडून दिले नाही. परिस्थितीमुळे कुटुंबाचाही विरोध होता. त्याला २०१३ मध्ये १७ वर्षांखालील राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाली. आठ सामन्यांत त्याने उत्तम संरक्षक करताना चार गोलही नोंदविले. वीस वर्षांखालील राष्ट्रीय संघातून खेळताना त्याला चार सामने खेळण्याची संधी मिळाली. अगदी लहान वयात त्याची कामगिरी उत्तम होत असल्यामुळे त्याला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने एलिट ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. तेथून त्याची फ्रान्समध्ये झालेल्या विशेष शिबिरासाठी निवड झाली. येथे त्याच्या शैलीला आणखी पैलू पडले. तेथूनच त्याची आएसएल हंगामासाठी निवड केली ती चेन्नईयनने. आयएसएलच्या त्याच्या पहिल्या हंगामाची सुरवात दबावामुळे अडखळत झाली तरी त्याला लवकरच सूर सापडला. चार सामन्यांत त्याला उभरता खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. हाही आयएसएलचा एक उच्चांकच आहे. आयएसएलच्या दहांपैकी आठ सामन्यांत त्याला संधी मिळाली आणि तो ७७६ मिनिटे मैदानावर होता. हाही उभरत्या खेळाडूने केलेला उच्चांकच आहे.

आयएसएलमध्ये चैन्नईयनकडून कोलकाता ॲटलॉन्टिकोविरुद्ध त्याने पदार्पण केले. अगदी तिसऱ्याच सामन्यात त्याला सामन्यातील उभरता खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला. पुणे सिटीविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याने एका गोलमध्ये सहायकाची भूमिका बजावली. या सामन्यातही त्याला उभरत्या खेळाडूचा पुरस्कार मिळाला. गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्याने फ्री किकवर अफलातून गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. चुरशीचा सामना चेन्नईयन ४-५ असा एका गोलच्या फरकाने हरला तरीही त्याला या सामन्यात चौथ्यांदा गौरविण्यात आले. जेरी सध्या चेन्नईयनकडून डीएसके शिवाजीयन्स क्‍लबकडे आलेला आहे. नव्या हंगामात तो या संघाकडून खेळणार आहे. चेन्नईयनचे प्रशिक्षक सय्यद पाशा त्याच्याबद्दल म्हणतात, की जेरीमध्ये नैसर्गिक गुणवत्ता खूप आहे. फ्रान्समधील शिबिरात त्याने पहिल्या दिवसापासून लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या डाव्या पायाच्या हालचाली अफलातून आहेत. बचावपटू म्हणून त्याने सरस कामगिरीच केली आहे. चुका सर्वांकडूनच होतात; पण त्यातून शिकण्याची त्याची जिद्द आहे. त्याला चांगले भवितव्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com