हेही नसे थोडके...

हेही नसे थोडके...

भारतीय ॲथलिट महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद ठरतो, तेव्हा आपण देशवासीय म्हणून अतिशय कडवट प्रतिक्रिया देतो. अशा खेळाडूला मिळालेल्या सुविधा, आपण दिलेले पाठबळ, त्याची परिस्थिती अशा कशाचाही विचार न करता आपण टीकेला सुरवात करतो. असाच अनुभव मोहंमद अनासने घेतला असावा. चारशे मीटर धावण्यातील हा उगवता भारतीय खेळाडू आहे. रिओ ऑलिंपिकसाठी तो पात्र ठरला; पण पहिल्याच फेरीत हरला. दुर्दैवाने ऑलिंपिक पात्रता फेरीतील वेळही त्याला नोंदविता आली नाही. आपण भारतीयांनी नाकं मुरडली; पण कोणतेही मैदान नसताना, प्रशिक्षक नसताना त्याने ४०० मीटरचा सराव झोकून देऊन केला. घरची परिस्थिती नसताना, एकट्या आईला मागे सोडून आपले स्वप्न साकारण्यासाठी लहान वयात घराबाहेर पडून अनासने आपले स्वप्न साकारले. निश्‍चितच आपल्याला अभिमान वाटावा, अशी ही कामगिरी आहे. पदक मिळणार नव्हतेच; पण जागतिक स्तरावर भारतीय येऊन धडकला, हेही यश कमी नव्हते.

अनासची कथा सुरू होते केरळमधील निलामेल खेड्यातून. भात शेतीने गावाभोवतीचा परिसर व्यापलेला. तेथे मैदान नव्हते. अनासला खेळाची आवड. त्यामुळे मिळेल तो खेळ खेळत असे. कधी या वेड्यावाकड्या बंधाऱ्यावर सुसाट धावण्याचा त्याचा छंद होता. कधी छोट्या टेकड्यांवरून धावत सुटायचा. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याचे असे अनियंत्रित धावणे सुरू होते. धावण्याच्या सरावाचा हा काही योग्य मार्ग नव्हता; पण तो म्हणतो, त्याने माझी क्षमता वाढली, हे निश्‍चित.

ॲथलेटिक्‍सचा मार्ग निवडणारा त्याच्या गावातील तो पहिलाच होता. तसे त्याचे वडीलही उत्तम स्प्रिंटर होते; पण त्यांनाही मार्गदर्शन मिळाले नाही. त्यांनी राज्य स्पर्धांपर्यंत धडक दिली; पण तेथे बंदुकीचा आवाज झाला, की धावत सुटायचे हेच त्यांना कुणीही सांगितले नव्हते. तीच स्थिती अनासवर ओढवली असती; पण तो किंचित सुदैवी ठरला.

शाळा धावण्याच्या स्पर्धेसाठी मुलांना पाठवायची; पण धावायचे कसे हे कोणीच शिकवत नव्हते. त्यामुळे त्याने थोरल्या भावाप्रमाणे उंचउडीचा सराव सुरू केला. त्याचेही मैदान नव्हते. जमीन खोदायची, तीच माती तेथे पसरायची आणि त्यात सराव करायचा. एक गंजलेला बांबू त्यासाठी उपयोगात आणायचा. तो मैदानावर पडलेला असायचा. एकदा गावातल्या भंगार विक्रेत्याने तो नेला आणि त्याच्या सरावात पुन्हा खंड आला. त्याच्या शाळेत ४ बाय ४०० मीटर रिलेसाठी एक खेळाडू कमी पडत होता. तेथील शिक्षकांनी त्याला धावणार का, असे विचारले. आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्याने हो म्हटले. त्या स्पर्धेत त्याने शाळेला तिसरा क्रमांक पटकावून दिला. बक्षीस म्हणून घरगुती साहित्य मिळाले. बक्षिसापेक्षा त्याला ४०० मीटर धावण्याचा छंद जडला. त्याला त्याची दिशा मिळाली.

सारं काही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. गावातल्या दोन खोल्यांमधील संसारावर चिंतेचा मोठा ढग आला. आई शीना यांनी मात्र हार मानली नाही. पदर खोचून ही माऊली मुलांसाठी उभी राहिली. मोलमजुरी केली आणि मुलांना ॲथलेटिक्‍ससाठी पाठबळ दिले. त्या म्हणतात, मीसुद्धा शाळेत असताना मैदान गाजवायची. शाळेत खेळात मिळालेली सर्टिफिकेट त्यांनी अजून जपून ठेवली आहेत. महाविद्यालयात गेल्यानंतर मात्र मला खेळाची मनाई करण्यात आली. आता मुले खेळात करिअर करताहेत म्हटल्यावर या माऊलीने त्यांच्यासाठी जीवाचे रान केले. पंचक्रोशीत कुठलीही धावण्याची स्पर्धा असली, की त्यासाठी त्याला पाठवायची. एकापाठोपाठ दोन्ही मुले लहान वयात प्रशिक्षणासाठी बाहेर पडली. दोघेही कुठलेही मिळालेले बक्षीस घरी पाठवतात आणि ती माऊली आपल्या जुन्या कपाटात त्यांना सन्मानाने स्थान देते.

अनासच्या शाळेत आलेल्या नव्या शिक्षकांनी त्याची क्षमता ओळखली आणि गावापासून दूरवर असलेल्या कोठामंगलम्‌ येथील शाळेत त्याला पाठविण्याचे ठरविले; तेव्हा अनास अवघ्या बारा वर्षांचा होता. याच शाळेत त्याला धावण्याचे थोडेफार तांत्रिक प्रशिक्षण मिळू लागले. त्याने राज्य आणि नंतर राष्ट्रीय स्पर्धा गाजविली. राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. पोलंडमधील स्पर्धेत त्याने रिओ ऑलिंपिकसाठीची पात्रता वेळ (४५.४० सेकंद) दिली आणि तो ४०० मीटरमध्ये ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा अवघा तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी मिल्खासिंग, बिंदू असे दोघेच या प्रकारात धावले आहेत.

रिओमध्ये त्याला ही पात्रता फेरीतील वेळही नोंदविता आली नाही; पण असंख्य अडथळ्यांवर मात करीत त्याने तेथेपर्यंत मारलेली धडक कौतुकास्पद आहे. अनास म्हणतो, ‘मी निवृत्त होईन तेव्हा माझ्या गावात मुलांसाठी धावण्याचे प्रशिक्षण मोफत देईन. माझ्यासारख्या खेळाडूला लहानपणापासून चांगले प्रशिक्षण मिळाले असते तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते. यापुढील पिढीवर अशी वेळ येऊ नये, यासाठी माझी धडपड असेल !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com