नवी मेरी कोम...?

नवी मेरी कोम...?

हरियानातील भिवानीपासून २० किलोमीटरवरील धनाना खेड्यातून साक्षी धनानाचा प्रवास अगदी लहान वयात सुरू होतो आणि तो ज्युनिअर वर्ल्ड बॉक्‍सिंगच्या कांस्यपदकापर्यंत येतो. तेथून तिचे लक्ष २०२० च्या टोकिओ ऑलिम्पिककडे आहे. त्यासाठी भिवानीमधील भिवानी बॉक्‍सिंग क्‍लब (बीबीसी) मध्ये तिचा अखंड सराव सुरू आहे. परीक्षा, सणवार अशा कुठल्याही गोष्टींमुळे तिच्या सरावात खंड पडत नाही. अवघ्या सोळा वर्षीय साक्षीने समरसून सुरू केलेला सराव पाहता मेरी कोमची वारसदार म्हणून तिच्याकडे बघता येईल.

धनाना खेड्यात तिचा जन्म ९ सप्टेंबर २००० ला झाला. गरीब शेतकऱ्याची ही सदृढ मुलगी. लहानपणापासूनच मैदानी खेळात आघाडीवर असणारी. चिखलात कुस्ती खेळणारी. तिची धडाडी पाहून तिच्या वडिलांनी तिला कुठला तरी एक खेळ निवडण्याची मुभा दिली, तेव्हा ती अवघ्या बारा वर्षांची होती. त्यावेळी तिने बॉक्‍सिंगला प्राधान्य दिले. गावातून एका छोट्या दुचाकीवरून तिला तिचे वडील दररोज भिवानीमधील बीबीसीमध्ये घेऊन जाऊ लागले. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यातच हरियानात प्रामुख्याने मुलींना खेळात करिअर करण्याची फारशी संधी नसते. अशा प्रतिकूल परिस्थितीत मात्र कुटुंबाने तिला प्रोत्साहन दिले. वडील तर तू मोठी खेळाडू हो, तुला शासकीय नोकरी मिळेल, असे तिला बजावून सांगत. या सांगण्यामागे गरिबी होती. अनेक भारतीय खेळाडूंप्रमाणे तिने या परिस्थितीवर मात केली. तीन वर्षे सातत्यपूर्ण सरावातून तिने स्वतःला घडविले. आपल्या गावाचे आणि बीबीसीचे नाव केले.

भिवानी बॉक्‍सिंग क्‍लबमध्ये विजेंदर सिंग, अखिल कुमार, दिनेश कुमार, जितेंदर कुमार आणि विकास कृष्णन यादव यांसारखे आंतरराष्ट्रीय बॉक्‍सर घडलेले आहेत. तेथील प्रशिक्षक जगदिश सिंग भारतातील आघाडीचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच हाताखाली विजेंदर घडला आहे. साक्षी त्याला आपला आयकॉन मानते. बीबीसीमध्ये साक्षीला जगदीश सिंग यांच्याकडून धडे मिळत आहेत. सकाळी तीन आणि सायंकाळी तीन असे सहा तास दररोज तिचा सराव आजही सुरू आहे. साक्षी आक्रमक खेळाडू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर थेट आक्रमणाची तिची सतत मानसिकता आहे. तिचे नैसर्गिक गुण ओळखून जगदीश सिंग यांनी तिला तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले.

साक्षीने हरियाना राज्य स्पर्धांतून चमकदार कामगिरी करण्यास सुरवात केली. थोड्याच अवधीत ती राष्ट्रीय पातळीवर आली आणि तिथेही तिने उत्तम कामगिरी केली. प्रशिक्षणाच्या पहिल्याच वर्षी तिने राज्यस्तरीय सब ज्युनिअर गटात विजेतेपद पटकावले. त्यानंतर राज्य स्पर्धेत आपल्या यशाची पुनरावृत्ती केली. ज्युनिअर गटात तिला आता फारसे आव्हान नव्हते. राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धातील यशामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे दरवाजे उघडले. तैपैईमध्ये झालेल्या वुमन वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये तिने ५४ किलो गटात सुवर्ण पटकावले. या यशानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिला प्रायोजकत्वही मिळाले.

साक्षी एका मुलाखतीदरम्यान म्हणते, की तुम्ही सतत प्रयत्नशील असाल तर तुम्हाला यश हुलकावणी देत नाही. प्रशिक्षक जगदीश सिंग यांनी कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, हे सातत्याने मनावर बिंबवले आहे. ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे ध्येय पहिल्यांदा खूप धूसर वाटत होते. त्या स्पर्धेसाठी आपण टिकू की नाही, याचा विश्‍वास नव्हता; पण जगदीश सिंग यांच्यामुळे तो आत्मविश्‍वास आता मिळाला आहे. माझ्या यशामागे कुटुंबाचे पाठबळही मोठे आहे. पारंपरिक विचारांना दूर ठेवून मला खेळात करिअर करण्यासाठी घर सोडण्याची नुसती परवानगी कुटुंबीयांनी दिली नाही तर लागेल ती मदत देण्याची तयारी ठेवली. लहान वयात या गोष्टी कळत नव्हत्या; पण त्या प्रवाहाच्या विरोधात वडिलांनी दिलेले पाठबळ मोठे होते. आता त्याची जाणीव होते आहे.

तैपेईतील यशानंतर साक्षीने सर्बियामध्ये झालेल्या नेशन कप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. सर्बियातील आव्हान मोठे होते. सुमारे ३४ देशांतील २५६ बॉक्‍सर यात सहभागी होते. साक्षी येथे ज्युनिअर गटातून ५४ किलो वजनी गटात खेळली. येथे जगभरातील ४५ उत्तम खेळाडूंचा सहभाग होता. साक्षीने तेथे भारताचा झेंडा फडकाविला.

विजेंदर सिंग याला प्रेरणास्थान मानणारी साक्षी म्हणते, देशासाठी आणि नंतर व्यावसायिक बॉक्‍सर म्हणून विजेंदर सिंगने मोठी कामगिरी केली आहे. भिवानी क्‍लबचा तो खेळाडू आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्याच्यासारखे मोठे यश मिळविण्याचे ध्येय आमच्यासमोर आहे. त्यामुळे टोकिओ ऑलिम्पिकची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com