माझी नव्हे, तर देशाची प्रतिष्ठा पणास - विजेंदर 

पीटीआय
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - भारताचा व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंग येत्या शनिवारी टांझानियाचा माजी विश्‍वविजेता फ्रान्सिस चेका याच्या आव्हानाला सामोरे जाईल. या लढतीत आपली नव्हे, तर देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली असेल, अशी भावना विजेंदरने व्यक्त केली. 

नवी दिल्ली - भारताचा व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंग येत्या शनिवारी टांझानियाचा माजी विश्‍वविजेता फ्रान्सिस चेका याच्या आव्हानाला सामोरे जाईल. या लढतीत आपली नव्हे, तर देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली असेल, अशी भावना विजेंदरने व्यक्त केली. 

विजेंदर जागतिक मुष्टियुद्ध संघटनेचा (डब्ल्यूबीओ) आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट गटाचा विजेता आहे. तो विजेतेपद राखण्यासाठी प्रथमच खेळेल. त्याला आणखी एक दणदणीत विजय मिळविण्याची संधी आहे. यंदाच्या वर्षाची सुरवात त्याने विजयाने केली. लिव्हरपूलमधील एको एरिनावर त्याने हंगेरीच्या अलेक्‍झांडर हॉवर्थला तिसऱ्या फेरीत हरविले. त्यानंतर त्याने लंडनमधील कॉपर बॉक्‍स एरिनावर फ्रान्सच्या मॅटीऔझ रॉयेर या अनुभवी प्रतिस्पर्ध्याला नॉक-आउट केले. त्यानंतर त्याने मे महिन्यात बोल्टन व्हाईट्‌स हॉटेलवर आंद्रेझ सोल्ड्रा याच्यावर मात केली. जुलै महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या केरी होपवर मात करून पहिले व्यावसायिक विजेतेपद मिळविले. जागतिक क्रमवारीत त्याने दहाव्या क्रमांकापर्यंत घोडदौड केली. 

विजेंदर आतापर्यंत अपराजित आहे. त्याने सात लढती जिंकल्या आहेत. यात सहा नॉक-आउटचा समावेश आहे. त्याने त्यागराज स्टेडियमवर होपला दहा फेऱ्यांत मात दिली. प्रत्येक फेरीत त्याने बाजी मारली. त्याच्या यशाची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. 

"आयओएस बॉक्‍सिंग प्रमोशन्स' ही कंपनी विजेंदरची प्रवर्तक आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरव तोमर आहेत. 

विजेंदरचा प्रतिस्पर्धी चेका कडवा लढवय्या आहे. त्याच्या खात्यात 43 लढतींचा अनुभव आहे. त्याने 32 विजय मिळविले आहेत. त्यात 17 नॉक-आउटचा समावेश आहे. 17 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने काही सनसनाटी विजय नोंदविले आहेत. 

मला आणखी एका विजयाचा आत्मविश्‍वास आहे. प्रत्येक सराव सत्रागणिक माझे फुटवर्क सरस होत आहे. याशिवाय मला आणखी ताकदवान बनल्यासारखे वाटत आहे. मी केलेली मेहनत आणि त्यागाचे परिणाम तुम्हाला 17 डिसेंबर रोजी दिसतील. हे माझे विजेतेपद आहे आणि अभिमानाने त्याचे संरक्षण करण्याचा माझा निर्धार आहे. ब्रिटन तसेच भारतात खेळताना मला मिळणारा पाठिंबा भारावून टाकणारा आहे. मी सर्वांचा विश्‍वास सार्थ ठरवेन. मी भारतीय नागरिकांसाठी विजेतेपद राखेन. 
- विजेंदर सिंग, व्यावसायिक बॉक्‍सर

Web Title: vijender singh vs francis cheka