धावपटूंचे गाव

धावपटूंचे गाव

ऑलिंपिक स्पर्धेतील विजेता म्हणजे अत्युच्च दर्जाची साधनं, प्रशिक्षण आणि भरपूर पाठिंबा, असं जे गुलाबी चित्र रंगवलं जातं, तसं प्रत्यक्षात अनेकदा नसतंच. ‘क्रीडानगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कित्येक शहरांमध्ये मेहनत करणारे खेळाडू आणि या सर्वांपासून कोसो दूर असलेल्या, मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या देशांमधील खेळाडूंची तशी तुलना नाही होऊ शकत; पण ‘स्पोर्टस इज अ ग्रेट लेव्हलर’ म्हणतात, तेही खरंच आहे; अन्यथा दहा कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या, तिसऱ्या जगात गणना होणाऱ्या इथिओपियाने गेल्या २० वर्षांत ऑलिंपिकची ३५ पदके पटकाविली आहेत. 

या देशातील बेकोजी हे शहर तसं बाकीच्या जगाच्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाहीच; पण या छोट्याशा शहरातून आलेल्या धावपटूंनी ऑलिंपिकमधील शर्यतींवर सातत्याने वर्चस्व राखले आहे. शेतीपलीकडे या शहरात वैयक्तिक विकास आणि प्रगतीसाठी दुसरा कुठला मार्ग जवळपास नाहीच. प्रामुख्याने गव्हाची शेती करणाऱ्या या शहरातून ‘ट्रॅक अँड फील्ड’मधील जगातील काही सर्वोत्तम खेळाडू तयार झाले आहेत. ‘धावणं’ हाच इथला स्थायीभाव आहे. त्यातच सेंतायेहू इशेतू (Sentayehu Eshetu) या अवलिया प्रशिक्षकाने अक्षरश: जीव ओतून इथे धावपटू घडवले आहेत. त्यामुळेच, कुठल्याही जागतिक पातळीवरच्या शर्यतीमध्ये इथिओपियाचा एखादा खेळाडू चमकतो, तेव्हा या बेकोजीमधील दोन लाखांच्या आसपास असलेल्या नागरिकांची मान ताठ होत असते. त्याला कारणही तसेच आहे. बेकोजी या गावातून घडलेल्या धावपटूंनी आतापर्यंत ऑलिंपिकमधील आठ सुवर्णपदके जिंकली आहेत, दहा वेळा जागतिक विक्रम मोडला आहे आणि ३२ वेळा जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा जिंकल्या आहेत. 

या जगावेगळ्या प्रवासाविषयी जेरी रॉथवेल या दिग्दर्शकाने २०११ मध्ये ‘टाऊन ऑफ रनर्स’ या नावाची एक डॉक्‍युमेंट्री तयार केली. कलात्मक जगामध्ये ती चांगली नावाजलीही गेली. धावपटू होऊ इच्छिणाऱ्या दोन मैत्रिणी आणि त्यांचे प्रशिक्षक इशेतू हे या डॉक्‍युमेंट्रीच्या केंद्रस्थानी आहेत. धावण्यातून जगण्याचा मार्ग शोधणारी ही इथिओपियातील किंवा एकूणच आफ्रिकेतील तरुण पिढी आणि त्यातून निर्माण होणारी तीव्र स्पर्धा, या स्पर्धेला तोंड देत जगण्याचे मार्ग, त्यात येणारे अडथळे आणि ‘धावण्या’चे आफ्रिकी आयुष्यातील स्थान या सगळ्याचा वेध या डॉक्‍युमेंट्रीत घेतला आहे. ही डॉक्‍युमेंट्री तयार करायला त्यांना चार वर्षे लागली. धावा, जिंका आणि कुटुंबाचे राहणीमान चांगले करा, हे समीकरण इथल्या मुला-मुलींच्या डोक्‍यात पक्कं आहे. मुलींच्या बाबतीत थोडं जास्तच.. कारण, जीवापाड मेहनत करूनही जिंकता आलं नाही, तर पुन्हा त्याच गरीबीत परतावे लागून लग्न करून घरी बसण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.. म्हणूनच, धावणं हाच इथला स्थायीभाव आहे आणि जगण्याचा मार्गही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com