INDvsAUS : विराट सभ्यतेची लक्ष्मणरेषा ओलांडतोय?

सुनंदन लेले
बुधवार, 19 डिसेंबर 2018

विराट कोहली महान फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नाही पण त्याच्या मैदानावरील वर्तणूकीवरून बरीच चर्चा होत आहे. विराटने टीम पेनला उद्देशून चुकीचे टोमणे मारल्याच्या बातम्याही पसरल्या . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा ठाम शब्दात इन्कार केला. तरीही विराटवर टिका परदेशातून पेक्षा भारतातून होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

विराट कोहली महान फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नाही पण त्याच्या मैदानावरील वर्तणूकीवरून बरीच चर्चा होत आहे. विराटने टीम पेनला उद्देशून चुकीचे टोमणे मारल्याच्या बातम्याही पसरल्या . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा ठाम शब्दात इन्कार केला. तरीही विराटवर टिका परदेशातून पेक्षा भारतातून होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

सुनील गावसकर निवृत्त झाल्यावर ‘आता पुढे काय होणार’ हा प्रश्न विचारला गेला होता. 1989 साली सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाले आणि सगळ्यांना हायसे वाटले. सचिन तेंडुलकर संघात असतानाच विराट कोहली भारतीय संघात दाखल झाला आणि सचिन निवृत्त झाल्यावर विराट कोहलीने भारतीय फलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. विराटच्या मैदानावरील पराक्रमाची चर्चा रंगत असताना त्याच्या मैदानावरील वर्तणूकीवरूनही चर्चा रंग भरताना दिसू लागली. 

विराट कोहलीबद्दल ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांना प्रचंड कुतूहल असते. सगळे पत्रकार कायम विराटबद्दल माहिती विचारत असतात. चालू मालिकेचे टीव्ही प्रक्षेपण हक्क ज्यांच्याकडे आहेत त्या फॉक्स स्पोर्टसने अत्यंत जाणीवपूर्वक एक कॅमेरा सतत विराट कोहलीवर केंद्रित केला आहे. विराटचे हावभाव टिपून लगेच दाखवण्यात फॉक्स स्पोर्टस् क्षणही वाया घालवत नाही. बरोबरच आहे म्हणा कारण टीव्ही प्रक्षेपण ज्या कारणाने आकर्षक दिसते ते सगळे विराट कोहली मैदानात करत असतो. फलंदाजी करताना त्याची छबी रणांगणात उतरलेल्या योध्यासारखी असते आणि भारतीय संघाची गोलंदाजी चालू असताना विराट कोहली सेनापतीसारखा सैन्य हाकताना दिसतो. प्रत्येक फलंदाज बाद झाल्यावर विराटची प्रतिक्रिया जोरदार असते जी टीव्हीवर बघायला जाम मजा येते.

बर्‍याच वेळा विराटच्या प्रतिक्रिया जास्त आविर्भावाच्या असतात. मग ओठांच्या हालचालीतून अपशब्द बाहेर पडत असल्याचे दिसते. कोहलीने आत्तापर्यंत समोरच्या संघातील खेळाडूंना उद्देशून अपशब्द वापरल्याची सरकार दरबारी नोंद नाही या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे. मुख्यत्वे ते बोलणे हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्वरूपातील असते फक्त टीव्हीवर ते बघताना जरा सभ्यतेला सोडून असल्यासारखे वाटते. 

सँड पेपर गेट म्हणजेच चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या वर्तणूकीवरून कडाडून टिका झाली. ऑसी खेळाडू जिंकण्याकरता वाटेल ते करतात आणि वाटेल ते बोलतात असे समोरच्या संघातील जवळपास सर्व खेळाडू म्हणाले. सँड पेपर गेट प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियनी संघाच्या गैरवर्तनाला अचानक आळा बसला. टीम पेनने संघाकरता सभ्य वागून खेळायचा आग्रह धरला. पेनने सामन्याअगोदर समोरच्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करायची प्रथा सुरु केली ज्याची माजी खेळाडूंनी थट्टा केली. दहा महिने टीम पेन सभ्य खेळाचा आग्रह धरून त्यामानाने कमजोर संघाचे धीराने नेतृत्व करत राहिला. दरम्यानच्या काळात एकही कसोटी सामना ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला नाही. 

पर्थ कसोटीत टीम पेनने यष्टीरक्षण करताना उत्तम कामगिरी केलीच तर फलंदाजी करताना दोन्ही डावात उपयुक्त खेळी करताना दाखवलेले धैर्य कौतुकास पात्र ठरले. या सगळ्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने सामना गमावला आणि मैदानावरचे त्याचे आविर्भाव जरा जास्त उत्कट होते. बघणार्‍या बर्‍याच लोकांना ते उत्कट भाव सभ्यतेला धरून जाणारे वाटले नाहीत म्हणून माजी भारतीय खेळाडूंपासून ते नसरुद्दीन शहांसारख्या क्रिकेटप्रेमी महान अभिनेत्यानेही त्याच्यावर टिका केली.

''विराट कोहली महान फलंदाज आहे मात्र त्याचवेळी अत्यंत खराब वर्तणूक करणारा खेळाडू आहे. त्याची उर्मट आणि असभ्य वर्तणूक त्याची मैदानावरील कमाल कामगिरी झाकोळून टाकत आहे,'' अशी कडाडून टीका नसरुद्दीन शहांनी केली आहे. माजी खेळाडू संजय मांजरेकरने, ‘विराटची वर्तणूक चुकीची असून त्याला योग्यवेळी आवर घालायची गरज आहे’, असे सांगितले आहे.

पर्थ कसोटी नंतर पत्रकारांशी बोलताना विराट कोहलीने सांगितले की , ‘कसोटी क्रिकेट खेळणे अत्यंत  स्पर्धात्मक असते. त्यामुळे मैदानात कुरघोडी करायला दोनही संघ जिवापाड प्रयत्न करत असतात. अशा दडपणाखाली थोडी बोलाचाली होते. पण कोणीही सभ्यतेची रेषा ओलांडली असे मला वाटत नाही. गेल्या दोन कसोटी सामन्यादरम्यान दोनही संघातील कोणीही बोलताना अपशब्द वापरले नाहीत त्यामुळे मला त्याबद्दल जास्त चर्चा करावीशी वाटत नाही’.

दुसरीकडे कोहलीच्या वर्तणुकीबद्दल विचारले असता टीम पेन म्हणाला की, ''विराटच्या वर्तणुकीचा अजिबात त्रास झाला नाही मला. खरे सांगायचे तर मला मजा आली. मला आवडते विराटला तसे खेळताना बघायला. मला वाटते की त्याच्या अशा वागणुकीने सर्व खेळाडूंमधली लढायची वृत्ती उफाळून वर येते जे चांगले आहे. अशी तीव्र लढत बघायला मजा येत असेल ना.''

हे मान्य करावे लागेल की विराट कोहली बर्‍याच वेळा ‘जरा अति करतो’. त्याच्या प्रतिक्रिया भावनांचा कडेलोट करणार्‍या दिसतात. विराटचा स्वभाव जात्याच आक्रमक आहे. फक्त कधीकधी टोकाची आक्रमकता अनावश्यक असते. विराटने आत्तापर्यंत तरी नियमांचे उल्लंघन केलेले नाही. वर्तणूकीवरून त्याला एकही शिक्षा झालेली नाही. फक्त क्रिकेटप्रेमींना ही भीती वाटते आहे की विराट कोहली तीच लक्ष्मणरेषा ओलांडायच्या उंबरठ्यावर उभा नाही ना?

Web Title: virat kohli crossing line