World Cup 2019 : आक्रमक कोहलीला दंड; पंचांशी हुज्जत पडली महागात 

virat
virat

वर्ल्ड कप 2019 : साउदम्प्टन : अफगाणिस्तानविरुद्धचा सोपा पेपर सोडवताना नाकीनऊ आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या तणावाच्या प्रसंगी एकवेळ आपला संयम गमावून बसला आणि एका निर्णयासाठी पंचांशी हुज्जतदेखील घातली. हीच हुज्जत त्याला महागात पडली असून, "आयसीसी'ने त्याला मानधनातील 25 टक्के रकमेचा दंड केला आहे. 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अधिक अपील करण्यासंदर्भात कोहली दोषी आढळल्याचे "आयसीसी'ने म्हटले आहे. खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेच्या नियम 2.1चे त्याने उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठीच त्याला हा दंड करण्यात आला. 

या घटनेप्रकरणी मैदानावरील पंच आलिम दर, रिचर्ड इलिंगवर्थ, तिसरे पंच रिचर्ड कॅलबोरोफ, चौथे पंच मायकेल गॉफ यांनी आयसीसी निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्याकडे सामन्यानंतर तक्रार केली होती. भारतीय कर्णधार विराट कोहली, संघ व्यवस्थापन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निरीक्षकांनी शिक्षेची घोषणा केली. 

काय घडले 
अफगाणिस्तानच्या डावातील 29व्या षटकांत बुमराचा एक चेंडू फलंदाज रहमत शाह याच्या पॅडवर आदळला. बुमराने यासाठी अपीलदेखील केले. त्या वेळी कर्णधार कोहली पंचांच्या दिशेने हातवारे करून त्यांना अपीलाविषयी सांगत होता. 

काय होते शिक्षा 
आयसीसीच्या खेळाडू आचारसंहितेच्या भंग प्रकरणातील हा लेव्हल 1चा गुन्हा धरला जातो. खेळाडूला ताकीद, किमान 50 टक्के दंड आणि एक किंवा दोन दोषांक खेळाडूला दिले जातात. याप्रकरणी कोहलीने चूक कबूल केल्यामुळे चौकशी केली नाही. स्वतःहून चूक मान्य केल्याने निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांनी मानधनातील 25 टक्‍क्‍यांचा दंड केला. त्याचबरोबर त्याला एक दोषांक देण्यात आला. 

कोहलीला दुसरा दोषांक 
कोहलीच्या नावापुढे दुसरा दोषांक लागला. यापूर्वी 15 जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याला एक दोषांक मिळाला होता. खेळाडूच्या नावापुढे दोन वर्षांत चार किंवा अधिक दोषांक झाले की त्याचे रूपांतर निलंबन गुणात होते. दोन निलंबन गुण झाले की त्या खेळाडूवर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन टी-20 सामन्यांची बंदी येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com