अफलातून विराटने गाठला सचिन, पॉंटिंग, लाराचा दर्जा: गांगुलीची स्तुतिसुमने

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीय फलंदाजांबरोबर; तर रिकी पॉंटिंग, ब्रायन लारा या फलंदाजांविरोधात खेळण्याचे भाग्य मला मिळाले आहे. विराट यानेही या जागतिक फलंदाजांचा दर्जा मिळविला आहे. प्रभावी नियंत्रण आणि परिस्थितीबरोबर पटकन जुळवून घेण्याची विराटची क्षमता याबरोबरच त्याच्या प्रत्येक खेळीमध्ये असलेली उर्जा व प्रखरता मला अत्यंत प्रभावित करते

नवी दिल्ली - भारतीय संघाच्या सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये नेत्रदीपक फलंदाजीचा चढता आलेख कायम ठेवणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीची भारताचा माजी कर्णधार सौरव याने मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. विराट याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या प्रतिथयश भारतीय फलंदाजांचा स्तर गाठल्याची स्तुतिसुमने गांगुलीने उधळली आहेत.

"भारतीय संघाने सध्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषत: कसोटी मालिका गमाविल्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-0 अशा घेतलेल्या आघाडीमधूनच विराट आणि संघाच्या मनोधारणेची स्पष्ट कल्पना येते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीय फलंदाजांबरोबर; तर रिकी पॉंटिंग, ब्रायन लारा या फलंदाजांविरोधात खेळण्याचे भाग्य मला मिळाले आहे. विराट यानेही या जागतिक फलंदाजांचा दर्जा मिळविला आहे. प्रभावी नियंत्रण आणि परिस्थितीबरोबर पटकन जुळवून घेण्याची विराटची क्षमता याबरोबरच त्याच्या प्रत्येक खेळीमध्ये असलेली उर्जा व प्रखरता मला अत्यंत प्रभावित करते. कारकिर्दीच्या या टप्प्यावरच 34 एकदिवसीय शतकांची नोंद, ही अत्यंत असामान्य बाब आहे. इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने अजून या दौऱ्यात शतक काढलेले नाही; आणि दक्षिण आफ्रिकेच्याही एका फलंदाजासच शतकी खेळी करता आली आहे, या एकाच बाबीमधून विराट याने या दौऱ्यात केलेल्या फलंदाजीमागील अफलातून गुणवत्ता स्पष्ट होते. आणि अजून हा दौरा संपायचा आहे!,'' असे गांगुली याने म्हटले आहे.

गांगुली याने युझवेंद्र चहल आनि कुलदीप यादव या भारतीय फिरकीपटूंचीही प्रशंसा केली आहे. विशेषत: दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त वळत नसतानाही भारतीय फिरकीपटूंनी करुन दाखविलेली ही कामगिरी अत्यंत आनंददायक असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

Web Title: virat kohli saurav ganguli sachin tendulkar india cricket south africa