फिरकीच्या पर्यायाचा विचारच केला नव्हता : कोहली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कोहली म्हणाला, ""जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहिली तेव्हा फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचार आम्ही सोडून दिला. अश्‍विन आजारी असल्यामुळे रवींद्र जडेजाचा पर्याय आमच्यासमोर होता. पण, खेळपट्टीचे स्वरूप पाहून वेगवान गोलंदाज पुरेसे आहेत यावर संघ व्यवस्थापनाचे एकमत झाले. लायनने सुरेख गोलंदाजी केली.

पर्थ - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे चार वेगवान गोलंदाज आपली जबाबदारी चोख बजावतील याची खात्री होती. त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचारच मनात आला नव्हता, असे भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले. 

ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनच्या फिरकीच्या साथीने दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवसअखेरीस भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यानेही तज्ज्ञ फिरकी गोलंदाजाची उणीव भासली, अशी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. साहजिकच सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कोहलीवर याच प्रश्‍नांचा भडिमार झाला. 

कोहली म्हणाला, ""जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहिली तेव्हा फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचार आम्ही सोडून दिला. अश्‍विन आजारी असल्यामुळे रवींद्र जडेजाचा पर्याय आमच्यासमोर होता. पण, खेळपट्टीचे स्वरूप पाहून वेगवान गोलंदाज पुरेसे आहेत यावर संघ व्यवस्थापनाचे एकमत झाले. लायनने सुरेख गोलंदाजी केली.

फिरकीच्या पर्यायाचा विचार आमच्या मनालाही शिवला नव्हता हे मी मान्य करतो.'' 
कोहलीने या वेळी आपल्या शतकी खेळीचेही समर्थन केले नाही. कोहली म्हणाला, ""मी शतक झळकावले इथपर्यंत ठीक आहे. पण, जेव्हा तुमचा संघ जिंकत नाही तेव्हा तुमच्या खेळीला महत्त्व नसते. तुम्ही तुमच्या खेळीचे महत्त्वही सांगू शकत नाही. आता आम्ही तिसऱ्या कसोटीचा विचार करण्यास सुरवात केली आहे.'' 

कोहलीचे बोल 
-ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम खेळ केला. ते कौतुकास पात्र आहेत. 
-ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर वर्चस्व राखले. 
-फसव्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा संयम निर्णायक ठरला. 
-आम्हीदेखील हे करू शकतो, असा विश्‍वास होता; पण ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा सरस खेळ केला. 
-पहिल्या डावात मला बाद देण्याचा निर्णय मैदानावर झाला आणि विषय तेथेच संपला. 
-भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ. 

Web Title: virat kohli talked about indian team selection