आनंदला ब्रॉंझपदक; विदीतसुद्धा लक्षवेधी 

Vishwanathan Anand
Vishwanathan Anand

रियाध (सौदी अरेबिया) : भारताचा ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने जलद प्रकारातील जगज्जेतेपदानंतर जागतिक ब्लिट्‌झ स्पर्धेत ब्रॉंझपदक संपादन केले. याबरोबरच त्याने बुद्धिबळप्रेमींना नववर्षाची आणखी एक भेट दिली. वयाच्या 48व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविल्यानंतर आनंदने 48 तास उलटण्याच्या आत आणखी एका जागतिक पदकाला गवसणी घातली. विदीत गुजराथीची कामगिरीही लक्षवेधी ठरली. 

शुक्रवारी सुरू झालेली स्पर्धा शनिवारी पार पडली. पारंपरिक प्रकारातील जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन याने जलद प्रकारातील निराशेतून सावरत ब्लीट्‌झमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 16 गुणांसह निर्विवाद यश मिळविले. रशियाचा सर्जी कॅर्जाकीन दुसरा आला. तो आणि आनंदचे प्रत्येकी 14.5 गुण झाले. यात प्रतिस्पर्ध्याचे सरासरी एलो रेटिंग हा टायब्रेकचा निकष होता. यानुसार सर्जी दुसरा आला. 

आनंदला पहिल्या दिवशी इयन नेपोमियांछी याच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. पहिल्या दिवशी 11 फेऱ्या झाल्यानंतर तो विसाव्या क्रमांकावर होता. त्याच्या खात्यात 7 गुण होते; पण दुसऱ्या दिवशी त्याने कामगिरी उंचावली. 11व्या फेरीतील हा पराभव एकमेव ठरला. अखेरच्या 21व्या फेरीत त्याने मॅक्‍झीम वॅचीएर-लॅग्रेव याच्यावर मात केली. 

आनंदला विसावे मानांकन होते. या तुलनेत त्याने कामगिरी कमालीची उंचावली. त्याचे एलो रेटिंग 2736 होते. या तुलनेत त्याने 2844 एलो रेटींगच्या तोडीची कामगिरी केली. त्याने 61 एलो रेटींगची कमाई केली. कार्लसनचे एलो रेटिंग मात्र 21ने कमी झाले. 

नाशिकचा ग्रॅंडमास्टर विदीत गुजराथी याने 53 वे मानांकन असताना 138 जणांच्या एकूण क्रमवारीत 22वे स्थान मिळविले. या तुलनेत 14वे मानांकन असलेला पी. हरिकृष्ण 25व्या क्रमांकावर घसरला. विदीतने 12.5 गुण मिळविले. यात जलद प्रकारातील आधीचा विश्‍वविजेता वॅसिली इव्हानचूक, पारंपरिक प्रकारातील माजी विश्‍वविजेता रुस्लान पोनोमारीव, मातब्बर लेव्हॉन अरोनीयन व देशबांधव हरी यांच्यावरील विजयांचा समावेश आहे. 

महिला स्पर्धेत पद्मिनी रोऊत 51व्या मानांकनाच्या तुलनेत 21वे स्थान मिळविले. पाचवी मानांकित ग्रॅंडमास्टर द्रोणावली हरिका 36व्या, तर 69वी मानांकित "इंटरनॅशनल मास्टर' ईशा करवडे 74व्या क्रमांकावर घसरली. जॉर्जियाची ग्रॅंडमास्टर नॅना झाग्नीद्‌झे विजेती ठरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com