पथक 800 सदस्यांचे, आशा 70 पदकांची

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघनिवडीचा वाद संपला आहे; पण एवढा सगळा आटापिटा केल्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटनेस या स्पर्धेत फार तर 70 पदकांचीच आशा आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनीच एका मुलाखतीत ही आशा व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघनिवडीचा वाद संपला आहे; पण एवढा सगळा आटापिटा केल्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटनेस या स्पर्धेत फार तर 70 पदकांचीच आशा आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनीच एका मुलाखतीत ही आशा व्यक्त केली आहे. 

भारतीय यंदाच्या स्पर्धेत नक्कीच गतस्पर्धेपेक्षा चांगली कामगिरी करतील. आपण या वेळी आपण 65 ते 70च्या आसपास पदके जिंकू शकतो. ही कामगिरी चार वर्षांपूर्वीच्या इनचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षा नक्कीच चांगली असेल, असे बत्रा यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी भारताने 11 सुवर्ण, नऊ रौप्यपदकांसह एकंदर 57 पदके जिंकली होती. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने अपेक्षित कामगिरीचा सखोल अभ्यास केला आहे. आपण नेमकी किती सुवर्णपदके जिंकणार हे सांगणे अवघड आहे. त्यात अनेक बाबी असतात, असे बत्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, हॉकीतील दोन पदके निश्‍चित आहेत. मला तर दोन सुवर्णपदकांचीच आशा आहे. संघ गेल्या काही महिन्यांत सातत्याने यश मिळवत आहे. या वेळी अनेक खेळांचा नव्याने समावेश आहे. त्यात सुखद धक्का बसू शकतो. 

युवा क्रीडापटूंकडून या वेळी अपेक्षा आहे. हीमा दास तीन पदके जिंकू शकते. तिची तेवढी क्षमता नक्कीच आहे. नीरज चोप्रा चांगला बहरात आहे. टेबल टेनिसमध्येही प्रभावी कामगिरी होईल. बॅडमिंटनमध्येही आपण चांगले यश मिळवत आहोत. आपल्या स्टार खेळाडूंनी जागतिक विजेतेपदास जवळपास गवसणी घातली आहे. चीन, जपान, इंडोनेशियाचे आव्हान जबरदस्त असेल. नेमबाजीतही अनुभवी आणि नवीन स्टार्स आहेत. रेंजवरही चांगली चुरस असेल. 

बत्रा म्हणाले, 
- भारतीय पथकाची निवड हेच आव्हान 
- क्रीडा मंत्रालयाच्या निकषानुसार निवड केल्यामुळे अनेक क्रीडा महासंघ नाराज 
- नियमाचे कठोर पालन करण्याचे ठरल्याने त्याबाबत आम्हीही काहीही करू शकत नव्हतो 
- भारतीय पथकास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे मोठ्या प्रमाणावर साह्य 
- स्पोर्टस इंडियाकडून पूर्वतयारीसाठी चांगल्या सुविधा 

Web Title: We expect 70 medals at Asian Games says Narinder Batra