तो शांत... बाकीचे खल्लास

dhoni raina
dhoni raina

जाळ्यातील सराव चालू असताना नेहमी तो, अगदी शेवटचा फलंदाज शेवटचा चेंडू खेळेपर्यंत मैदानात जातीने हजर असतो. 15 ऑगस्टला त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या सरावाचा शेवटचा टप्पा सुरू असताना सव्वासात वाजता आपली बॅग आवरली भरली आणि तो आत ड्रेसिंग रूममधे गेला. इतक्या वर्षांत त्याला मोबाईल वापरताना कोणीच बघितले नव्हते. शनिवारी मात्र त्याने मोबाईल बाहेर काढला. तो कोणाशी काही बोलला नाही फोनवर त्याने फोनवर काहीतरी टाइप केले आणि नंतर बटण दाबून झाल्यावर तो गालातल्या गालात हसला  आणि एकदम शांत बसून होता.

एव्हाना साडेसात नंतर बाकीचे सहकारी हळू हळू सराव संपवून आत आले आणि मग सगळे आपापला फोन बघू लागले तेव्हा व्हायचा तो आघात झाला. महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती हे इन्स्टाग्रामच्या त्याच्या सरळ साध्या पोस्टवरून खेळाडूंना समजले. कोणाचाच विश्वास बसत नव्हता. खास करून सुरेश रैना जाम भावूक झाला होता. धोनी ड्रेसिंग रूम मागच्या भागात असलेल्या हॉलमध्ये गेला आणि खेळाडूंच्यात हळू आवाजात कुजबुज सुरू झाली. सगळेच दबक्या आवाजात आश्चर्य व्यक्त करत होते.

थोडा वेळ गेला नसेल तर, सुरेश रैना आत गेला आणि त्यानेही सोशल मिडियावर पोस्ट करून आपण धोनीच्या निवृत्तीच्या प्रवासात बरोबर असल्याचे सांगत आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मग सगळे खाण्याच्या टेबलवर बसले. महेंद्रसिंग धोनी नेहमीप्रमाणे हसत खेळत गप्पा मारत जेवायला लागला. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या थाळीत खाणे घेतले असले तरी, कोणाचा हात तोंडात जात नव्हता. फक्त आश्चर्याने बोटे तोंडात जात होती की धोनी म्हणजेच त्याचा लाडका 'माही भाई' इतका मोठा निर्णय इतक्या साधेपणाने घेऊन इतक्या शांतपणे जेवण कसे करू शकतो.

भावनिक पूर ओसंडून गेल्यावर सगळे खेळाडू मनातून स्थिर झाले. धोनीनेच सगळ्यांना संघ राहात असलेल्या हॉटेलमधे संघाची चर्चा करायची कॉमन रूम होती तिथे बोलावले. मग रंगली गप्पांची, गाण्यांची, खाण्याची दिलखुलास मेहफील. कोणी डोके लढवले होते माहीत नाही. पण, संगीत जे चालू होते त्याच जास्त करून दोस्तीवरची गाणी लावली गेली. सगळे खेळाडू धोनीने आपल्याला मार्गदर्शन कसे केले याच्या कहाण्या सांगत भावना व्यक्त करत होते. मधूनच धोनी खेळाडूंना अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सांगत होता. मेहफील रंगत गेली तसे गेली 16 वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करणारा विक्रमी कप्तान महान विकेट किपर आणि धडाकेबाज आणि त्यापेक्षा अत्यंत भरवशाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनीने खास त्याच्या शैलीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याच्या सत्याला सगळे खेळाडू कसेबसे मान्य करू लागले होते.

धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द
* महेंद्र सिंग धोनीने 23 डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 
* धोनीने 350 एकदिवसीय सामन्यात 50.6 च्या सरासरीने10773 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 10 शतक आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. 
* एकदिवसीय कारकिर्दीत पाकिस्तानविरुद्ध नाबाद 183 ही सर्वोत्तम धावसंख्या त्याने नोंदविली. 
* धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये खेळताना 38.1 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. 
* एम एस धोनीने 2 डिसेंबर 2005 मध्ये श्रीलंकेच्या सामन्यातून कसोटीत आगमन केले होते. 
* कसोटीत त्याने 6 शतके व 33 अर्धशतके केली आहेत.      
*कसोटी प्रकारात 224 धावांची सर्वोच्च खेळी
* टी-20 मध्ये धोनीने 98 सामन्यात 37.6 च्या सरासरीने 1617 धावा ठोकल्या आहेत. 
* 126.1 च्या स्ट्राईक रेटने धावांची बरसात करणाऱ्या धोनीने टी-20 प्रकारात केवळ 2 अर्धशकते झळकावली आहेत मात्र, त्याला टी-20 मध्ये शतक करता आले नाही. 
* आयपीएलमध्ये 190 सामने खेळताना 42.2 च्या सरासरीने त्याने 4432 धावा केल्या आहेत. 
* धोनीने आयपीएलमध्ये 23 अर्धशतके झळकावली आहेत मात्र, इथेही त्याला शतक करता आलेले नाही. 
महेंद्र सिंग धोनीच्या नावावर इतर विक्रम. 
* महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून भूमिका बाजवताना सर्वात जास्त स्टंम्पिग (195) केले आहेत. त्याच्यानंतर श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगक्कारा (139) चा दुसरा नंबर लागतो. 
* यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीने झेल (829) टिपले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात धोनी केवळ दक्षिण आफिकेचा मार्क बाऊचर (998) व ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्ट (905) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com