पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी बंद स्टेडियममध्ये क्रिकेट का खेळले जाऊ शकत नाही? | Closed Stadiums | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Closed Stadiums

Closed Stadiums: पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी बंद स्टेडियममध्ये क्रिकेट का खेळले जाऊ शकत नाही?

आयपीएल 2023 फायनलमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पावासाने मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणला होता. अखेर सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळवला गेला होता. मात्र त्या दिवशी देखील पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सामना रात्री उशीरा 15 षटकांचा खेळवला गेला.

सोमवारी रात्री उशिरा चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. हा सामना अतिशय रोमांचक होता, शेवटच्या दोन चेंडूंवर जडेजाने आपला क्लास दाखवला आणि एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने CSKला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर एक मुद्दा चांगला चर्चेत आला. पावसाचा प्रभाव टाळण्यासाठी बंद स्टेडियममध्ये क्रिकेट का खेळले जाऊ शकत नाही?, असा प्रश्न क्रीडा विश्वात निर्माण झाला आहे. क्रिकेट हा खेळ इतिहासातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक आहे. हा खेळ जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये खेळला जातो आणि जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे.

मात्र अशा काही घटना घडल्या आहेत जेव्हा पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि त्यामुळे खेळाचा पूर्ण धुव्वा उडाला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. हा खेळ रविवार, 28 मे रोजी होणार होता, परंतु जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने धुमाकूळ घातला.

त्यामुळे अनेक क्रिकेटचे कट्टर चाहते नाराज झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होता. “पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी क्रिकेट स्टेडियमला ​​पूर्णपणे छप्पर का लावता येत नाही?". मात्र बंद स्टेडियममध्ये क्रिकेट का खेळता येत नाही याची काही व्यावहारिक कारणे आहेत. ते आपण समजून  घेऊया.

व्यावहारिक कारणे समजून घ्या -

  • इतर खेळांप्रमाणे क्रिकेटचा सामना खेळपट्टी कशी असेल आणि नैसर्गिक परिस्थिती कशी असेल यावर अवलंबून असतो. SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांप्रमाणे क्रिकेट हवामानाच्या परिस्थितीमुळे अवलंबून असतो. या देशात बॉल स्विंग - स्पिन होतात. मात्र भारतीय उपखंडांमध्ये परिस्थिती वेगळी आगे. इथ बंद स्टेडियममध्ये खेळ खेळला गेल्यास ऊन असो वा ढगाळ वातावरण असो, चेंडूची नैसर्गिक हालचाल होणार नाही.

  • यामागचे आणखी एक मोठे कारण म्हणजे खेळाचे बजेट मोठे असते. तरी देखील क्रिकेट खूप झपाट्याने विकसित होत असूनही आणि अनेक देश हा खेळ स्विकारत आहेत. मात्र अनेक क्रिकेट स्टेडियमची क्रिकेट खेळ बंद स्टेडियममध्ये खेळवण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही. ओपन स्टेडियमच्या तुलनेत बंद स्टेडियम बांधणे जवळजवळ दुप्पट महाग आहे.

  • यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे फलंदाजाने फटका मारल्यानंतर तो की उंचीवर जाईल याचा अंदाज नसतो. जर तो छताला लागला तर क्षेत्ररक्षकाला तो पकडणे कठीण होईल. तसेच स्टेडियममध्ये सूर्यप्रकाश देखील येणार नाही. कृत्रिम प्रकाशात क्रिकेट खेळणे नेहमीच महाग असते.