महिला कंडक्‍टरच्या मुलाने साकारले भारताचे जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

घाटकोपर मरोळ ही 334 क्रमांकाची बेस्ट शनिवारी दुपारी सुरू होती, त्या वेळी प्रवाशांना वाहतूक कोंडीची चिंता भेडसावत होती; तर त्यातील कंडक्‍टर वैदेही अंकोलेकर यांना आपल्या मुलाची कामगिरी पाहता येणार का, हा प्रश्‍न सतावत होता. वैदेही यांचा मुलगा अथर्व याने आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून दिले. अथर्वचे मित्र त्याच्या स्वागताच्या तयारीत आहेत. त्याचवेळी मुलाच्या यशासाठी कष्ट घेणाऱ्या वैदेही रविवारी शालेय मुलांच्या शिकवणी घेत होत्या.

मुंबई : घाटकोपर मरोळ ही 334 क्रमांकाची बेस्ट शनिवारी दुपारी सुरू होती, त्या वेळी प्रवाशांना वाहतूक कोंडीची चिंता भेडसावत होती; तर त्यातील कंडक्‍टर वैदेही अंकोलेकर यांना आपल्या मुलाची कामगिरी पाहता येणार का, हा प्रश्‍न सतावत होता. वैदेही यांचा मुलगा अथर्व याने आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून दिले. अथर्वचे मित्र त्याच्या स्वागताच्या तयारीत आहेत. त्याचवेळी मुलाच्या यशासाठी कष्ट घेणाऱ्या वैदेही रविवारी शालेय मुलांच्या शिकवणी घेत होत्या.

मुलांनी चांगले क्रिकेटपटू व्हावे, हे स्वप्न अथर्वच्या वडिलांनी पाहिले होते. त्यांचे 2010 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैदेही मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या फारशा धावा झाल्या नाहीत, तरीही आपल्या मुलाने संघास विजयी केले त्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. अथर्वच्या कौतुकाचे फलक अंधेरीत लागले आहेत. तो आज रात्री येईल. त्याच्या कौतुकाचे फोन थांबतच नाहीत. त्याच्या स्वागताची मीच नव्हे तर त्याचे मित्रही तयारी करीत आहेत. आता ना शिकवणी घेत आहे, हे वैदेही यांचे उद्‌गार त्या मुलांसाठी किती कष्ट घेतात हेच सांगतात.

मरोळ घाटकोपर बसमध्ये काम करीत असताना मी मोबाईलवर स्कोअर बघत होते. ड्युटी सकाळची होती आणि भारताची गोलंदाजी नंतर होती, त्यामुळेच मी अथर्वची कामगिरी पाहू शकले. मला मॅच बघण्यासाठी अर्धा तास लवकर सोडण्यात आले. त्याची कामगिरी मी पाहू शकले, याचा मला खूप आनंद आहे. आज त्याचे वडील हवे होते. त्यांना अभिमान वाटला असता, अथर्वच्या आई सांगत होत्या.

आपल्या कष्टामुळेच अथर्वने प्रगती केल्यावर त्या चटकन म्हणतात, अथर्वच्या वडिलांचे निधन झाले त्या वेळी मी त्याला क्रिकेट सुरू ठेवायचे का हे विचारले. त्याने हो असे सांगितले, पण त्यासाठी मीच कष्ट घेतले नाहीत. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या सहकारी, मित्र, अथर्वच्या मार्गदर्शकांनी खूप मदत केली, म्हणून तर मी दोन मुलांना वाढवू शकले, वैदेही सांगतात. वैदेहींना भविष्यातील आव्हानाची जाणीव आहे. त्याला खूप प्रगती करावी लागणार, ही तर सुरुवात आहे, असेच त्या सांगतात.

सचिनची अमूल्य भेट
अथर्व खूप लहान होता, त्या वेळी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी क्रिकेटची बॅट आणली होती. ते त्याला महान क्रिकेटपटूंनी कसे पराक्रम केले, त्यासाठी काय केले हे सांगत असत. तिथून त्याला क्रिकेटची गोडी लागली. त्यातून विविध स्पर्धांतून प्रगती करीत भारताच्या 19 वर्षांखालील संघात आला. नेटमधील सरावात अथर्वने एकदा सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती, त्या वेळी सचिनने त्याला आपले स्वाक्षरी असलेले ग्लोव्हज्‌ भेट दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women conductor son shine in India;s championship