
Shafali Verma 12th CBSE : शफालीनं शेअर केलं मार्कशिट! क्रिकेटचं मैदानानंतर 12 वीच्या परिक्षेत देखील धडाकेबाज कामगिरी
Shafali Verma 12th CBSE Mark Sheet : भारतीचा युवा महिला क्रिकेटपटू शफाली वर्मा गेल्या काही वर्षापासून क्रिकेटचं मैदान गाजवण्यात अग्रेसर आहे. 19 वर्षाच्या या धाकड बॅटरने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. नुकतेच तिच्या नेतृत्वाखाली 19 वर्षाखालील भारतीय महिला संघाने पहिला वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम देखील केला होता.
क्रिकेटचं मैदान लिलया गाजवणाऱ्या शफालीने CBSE बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेत देखील छप्पर फाडके मार्क मिळवले आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊटवरून हे मार्कशीट शेअर केले. मार्कशीट शेअर करत शफाली म्हणते की, '2023 मध्ये अजून एक खास 80 प्लस खेळी केली. मात्र यावेळी 12 वीच्या बोर्डात ही कामगिरी केली आहे. मी मला मिळालेल्या मार्कांवर खूप खूष आहे आणि आता माझ्या सर्वात आवडत्या विषयात सर्वस्व झोकून देण्यासाठी आतूर आहे. तो विषय म्हणजे क्रिकेट!'
शफाली वर्मा ही हरियाणाच्या रोहतकची आहे. जरी ती 19 वर्षाची असली तरी ती वरिष्ठ भारतीय संघातील एक महत्वाची खेळाडू आहे. ती स्मृती मानधनासोबत सलामीला येते. आक्रमक प्रवृत्तीच्या शफालीने आतापर्यंत 2 कसोटी सामन्यात 242 धावा केल्या आहेत. तर 21 वनडे सामन्यात 531 तर 56 टी 20 सामन्यात 1333 धावा ठोकल्या आहेत.