राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटची पुन्हा एन्ट्री; नेमबाजीला स्थान नाहीच

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नेमबाजी क्रीडा प्रकारास बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याच्या निषेधार्थ भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असला, तरी या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याच्या निर्णयावर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ठाम आहे. त्याचवेळी त्यांनी या स्पर्धेत महिला टी 20 क्रिकेटचा समावेश केल्याचे जाहीर केले. 

लंडन : नेमबाजी क्रीडा प्रकारास बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याच्या निषेधार्थ भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असला, तरी या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याच्या निर्णयावर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ठाम आहे. त्याचवेळी त्यांनी या स्पर्धेत महिला टी 20 क्रिकेटचा समावेश केल्याचे जाहीर केले. 

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा ल्युसी मार्टिन यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या,"भारताने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला, तरी नेमबाजीच्या वगळण्याच्या निर्णयावर फेरविचार होणार नाही. यजमान देशास क्रीडा प्रकार निवडण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार आहे. त्यांनी नेमबाजीच्या समावेशास विरोध केला आहे. आम्हाला त्यांच्या भूमिकेचा आदर करायला हवा.'' 

भारताला या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदकाची खात्री होती. भारतीयांची नाराजी आम्ही समजू शकतो, पण आम्ही काही करू शकत नाही, असे सांगून मार्टिन म्हणाल्या,""नेमबाजी आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत समाविष्ट असला, तरी हा क्रीडा प्रकार अनिवार्य नाही. आम्ही भविष्यात यावर विचार करू. पण, या वेळी नेमबाजीचा समावेश होऊ शकत नाही. क्रीडा प्रकारासाठी जागाच शिल्लक नाही.'' 

महिला टी 20चा समावेश 
मार्टिन यानी या वेळी महिला टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे 1998 नंतर पुन्हा एकदा क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेचा भाग राहिल. त्या वेळी पुरुषांच्या मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेटचा समावेश केला होता. दक्षिण आफ्रिका संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 
टी 20 क्रिकेटमध्ये आठ संघाचा सहभाग असेल. सामने आठ दिवस चालतील. हे सर्व सामने एजबस्टन मैदानावर होतील. क्रिकेटचे सामने हे "आयसीसी'च्या क्रिकेट नियमांप्रमाणेच होतील आणि नियमानुसारच पंचांची नियुक्ती केली जाईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा ल्युसी मार्टिन यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या,"महिला खेळाडूंना क्रिकेटमधील आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी आणखी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांमधील क्रिकेटच्या प्रसारास यामुळे चालना मिळेल.'' 

महिला क्रिकेटसाठी ही ऐतिहासिक घटना आहे. महिला क्रिकेटची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. हा महिला क्रिकेटचा सन्मानच आहे. 
मनु सॉनी, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी 

महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण असेल. राष्ट्रकुल क्रीडा परिवारात क्रिकेटच्या पुर्नप्रवेशाचे स्वागत करतो. 
-ल्युसी मार्टिन, राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens T20 Crickets inclusion confirmed in 2022 Commonwealth Games